इंदापूर

काटी– लाखेवाडी सर्वसाधारण, परंतु जातीय समीकरण साधण्याचे नेत्यांपुढे मोठे आव्हान.

वाघमोडे, यादव, ढोले, झगडे यांची नावे चर्चेत.

विजय शिंदे

इंदापूर तालुक्यातील नव्या रचनेत तयार झालेला काटी लाखेवाडी जिल्हा परिषद गटामध्ये सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले, तर काटी पंचायत समिती गणासाठी सर्वसाधारण व लाखेवाडी गणासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्री आरक्षण जाहीर झाले.

या गटात सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले असले तरी मराठा समाजासोबतच ओबीसी समाजाचा प्रभाव पाहता माळी किंवा धनगर समाजाला सर्वच पक्षातून प्राधान्य मिळण्याचे संकेत आहेत.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भाजप नेते प्रवीण माने यांच्या नेतृत्वाखाली या गटात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे, पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनाही मानणारा एक वर्ग या गटात आहे.

जिल्हा परिषद सदस्यासाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्याने हर्षवर्धन पाटील गटाकडून इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव वाघमोडे, निरा भिमाचे संचालक कृष्णाजी यादव, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला अध्यक्ष छाया पडसळकर, शशिकांत शेंडे, राजकुमार जाधव यांचे नाव चर्चेत आहे. तर राष्ट्रवादीकडून तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले, बापू शेंडे, हेमंत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.

शिवसेना (UBT) इंदापूर तालुकाप्रमुख नितीन शिंदे, तसेच भारतीय जनता पक्षाकडून अमोल मुळे इच्छुक आहेत.

या गटाची नव्याने रचना झाल्याने पूर्ण समीकरणे बदलली आहेत, निरा भिमा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात हा गट येतो, कारखान्याचा कामगार व सभासद वर्ग या गटात मोठ्या प्रमाणात वास्तव्यात असल्याने हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी हा गट सुलभ मानला जात आहे.

मागील काही वर्षांत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली या गटामध्ये कोट्यवधीच्या निधीतून विविध विकासकामे पूर्ण झालेली आहेत. या गटात ओबीसी मतदारांचा मोठा प्रभाव असून विधानसभा निवडणुकीमध्ये कृषिमंत्री भरणे यांना या गटातून चांगले मतदान झाले आहे.

या गटामध्ये प्रामुख्याने मराठा,माळी, धनगर, वंजारी या समाजांचे प्राबल्य आहे. यामुळे या गटात उमेदवारी देताना सर्वच पक्षांच्या नेत्यांची मोठी दमछाक होणार आहे.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व माजी सभापती विलासराव वाघमोडे किंवा कृष्णाजी यादव यांना जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दिल्यास कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनाही जातीय समीकरण साधण्यासाठी धनगर किंवा माळी समाजातून उमेदवाराची निवड करावी लागणार आहे.

जिल्हा परिषदे सोबतच पंचायत समितीचे उमेदवार निवडतानाही दोन्ही राष्ट्रवादी व भारतीय जनता पक्षाला जातीय समीकरण साधावी लागणार आहेत.

अतुल झगडे की सौभाग्यवतींना संधी.

२०२४ विधानसभा निवडणुकी वेळी जुन्या काटी वडापुरी गटातील प्रचाराचे नियोजन कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी पार पाडले होते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बालेकिल्ल्यात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना विधानसभा निवडणुकीत प्रथमच लीड मिळाले होते त्याचे बक्षीस उमेदवारीच्या रूपात अतुल झगडे यांना मिळण्याची शक्यता आहे, लाखेवाडी गण नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री साठी राखीव असल्याने झगडे यांच्या पत्नी झगडेवाडी गावच्या माजी सरपंच रूपाली झगडे यांच्याही नावाची चर्चा आहे, सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई खरात या गटातून लढण्यासाठी इच्छुक आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button