५ जानेवारीपासून भरता येईल झेडपीसाठी अर्ज ?
दोन टप्प्यात होणार जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक.

विजय शिंदे..
राज्यातील १७ जिल्हा परिषदांमधील आणि तीन जिल्हा परिषदांमधील पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांची निवडणूक आता दोन टप्प्यात होणार आहे.पहिल्या टप्प्यात १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी होणार आहेत. दुसरा टप्पा न्यायालयाच्या निर्णयानंतर होईल, असे राज्य निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
“या” जिल्हा परिषदेच्या निवडणुका..
सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, परभणी, धाराशिव व लातूर या १२ जिल्हा परिषदा व त्या जिल्ह्यातील १२५ पंचायत समित्यांची निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार आहे. आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूका दुसऱ्या टप्प्यात होतील, पण त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडून मार्गदर्शन मागविले आहे.
५ जानेवारीपासून भरता येईल झेडपीसाठी अर्ज ?
महापालिकेसाठी उमेदवारांना २३ ते ३० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. २ जानेवारीला अर्ज माघार आणि ३ जानेवारीला चिन्हवाटप होऊन प्रचाराला सुरवात होईल. तत्पूर्वी, जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. दरम्यान, ज्या जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदांच्या निवडणुका नाहीत, तेथील अधिकारी उपलब्ध करून २१ दिवसांत १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. ५ जानेवारीपासून उमेदवारांना अर्ज भरता येईल, जेणेकरुन मुदतीत निवडणूक संपतील, असे आयोगाचे नियोजन आहे.



