Uncategorized

इंदापूरची सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील एक पिढी घडविणारे शिक्षक राजेंद्र जाधव यांचे वाढदिवसानिमित्त…

शिक्षक ही जेव्हा वृत्ती होती. तद्दन गल्ला भरू प्रवृत्ती किंवा व्यवसाय नव्हता. अशा काळामध्ये तुम्ही शिक्षकी पेशाला सुरूवात केली. कबीर म्हणतात गुरू गोविंद दोनो खडे काके लागू पाय? ह्या प्रश्नाचे उत्तर देताना कबीराच्या समोर उभा असणारा शिक्षक आयुष्यभर तुम्ही जपलात. म्हणूनच आमच्यासारखे तुमचे कित्येक विद्यार्थी आयुष्याच्या विविध लढाईला यशस्वीपणे सामोरे जाताना दिसत आहेत. १५ एप्रिल हा तुमचा वाढदिवस म्हणून पहिल्यांदाच तुमच्याशी पत्ररूपाने आणि तेही जाहीरपणे बोलतोय.

शिक्षकाचा मुलगा शिक्षक या नात्याने नव्हे तर काहीतरी वेगळं घडवायचं म्हणून तुम्ही शिक्षणसेवेत आलात आणि हे कायमस्वरूपी जपलंय. तुम्हाला स्वतःलाच वक्तृत्वाचा नाद आणि वाचनाचा प्रचंड व्यासंग. आज महाराष्ट्रभर वक्तृत्व स्पर्धा गाजवणारे आणि विविध, सभा जिंकणारे तुमचे विद्यार्थी पाहिले की तुमचे स्पर्धा गाजवायच्या आणि सभा जिंकायच्या या वाक्यांची आठवण होते.

ज्या काळामध्ये नाटक काय असते हे ही माहीत नव्हते
अशा वेळी नाटकाच्या प्रचंड
प्रांगणात तुम्ही नुसते आणुन
सोडलेच नाही तर अजुनही माझा हात धरलेला आहे. माझ्या आयुष्यातील नाटकाचे सुरूवातीचे धडे मी तुमच्याकडून गिरवले.

‘दया माझा धर्म’ हे नाटक बसवण्यासाठी आपण दिवसभर आणि रात्री उशीराही तयारी करायचो. खूप खूप मेहनत घेवूनच स्पर्धेत उतरायचं आणि स्पर्धा जिंकण्यासाठीच करायच्या हे तुम्ही शिकवलत वर्धमान महाविद्यालयात आपण केलेलं ते पहिलंवहीलं नाटक, ग्रामीण भागात असुनही उभा केलेला सेट आणि आमची वेशभुषा त्यावेळी कौतुकाचा विषय झालेली. आपल्या नाटकाला दुसरं आणि मला उत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक मिळालं. दर्शन घेण्यासाठी मी खाली वाकलो, पाठीवर थाप मारून तुम्ही म्हणाला होता, की कोणत्याही नाटकाला एक भाषा असते पण रंगभूमीवर नाटक फक्त त्या विशिष्ट भाषेच्या जोरावर नव्हे तर अभिनयाची भाषा असते त्याच्या जोरावर चालते. मला त्यावेळी अभिनयाची भाषा समजली नाही पण उदयपुरला अमराठी प्रांतात नाटक मराठीत सादर करूनही नाटकाला बक्षीस मिळाले तेव्हा अभिनयाच्या भाषेची ताकद उमगली. आजही अमेरीकेतून विशाल गावाविषयी बोलत असताना तुमच्या नाटकाच्या तालमी विषयी खुप अभिमानाने बोलतो. गुणी विद्यार्थी हेरणारे अनेक शिक्षक असतीलही पण एखाद्या मुलातील एखादा विशेष गुण निवडून त्यावर पैलू पाडून त्यासाठी त्याला गुणी बनविणारा तुमच्या सारखा शिक्षक खूप दुर्मिळ.

मराठी शिकवत असतानाच तुमचा व्यासंग आणि इतिहास शिकवतानाचा तुमचा त्वेष तेव्हा मला भारावून सोडायचा आयुष्यावर प्रचंड प्रभाव पाडणारे खांडेकर, कुसुमाग्रज, नेमाडे, सुर्वे हे तुम्हीच पहिल्यांदा भेटवीले. तुम्ही शिकवलेला हिटलर आजही मनात विजीगिषु वृत्तीसाठी साठुन राहिला आहे. अलीकडे गावाला आल्यावर आपली नेहमीच भेट होते. मग समाजकारणापासुन ते राजकारणा पर्यंत अर्थकारणांपासून ते कृषि धोरणांपर्यंत रमलेल्या आपल्या चर्चा, तुम्ही जन्मताच नावाप्रमाणे राजेंद्र होताच पण राजेंद्रापासून ज्ञानेंद्रापर्यंतचा तुमचा लिलया प्रवास सहज लक्षात येतो.

दिल्लीमध्ये योजना आयोगात काम करत असताना सॅम पित्रोदा, प्रा. अभिजीत सेन, डॉ. अहलुवालीया, अशा माणसांना भेटल्यावर माझ्या भावनांना मोकळं करण्यासाठी मला तुमचीच गरज पडायची. लहानपणापासुन आपल्या भाषणातून फक्त मोठ्या माणसांचे गुण गाण्यासाठी आपला जन्म झाला नाही. त्यांचे विचार गाण्यासाठी नाहीत तर जगण्यासाठी आहेत हे तुम्हीच बिंबवलत. म्हणुन वक्तृत्वात प्रचंड कामगिरी करूनही तुमचा विद्यार्थी गाणारा भाट बनला. हे माझ्या पाहण्यात कधीच आलं नाही.

मागे मी एकदा अशाच आपल्या रमलेल्या गप्पात माझी स्वप्ने तुम्हाला ऐकवीत होतो. आणि तुमच्या डोळ्यात चक्क पाणी दाटून आले होते. आयुष्यभर विविध स्वप्ने पाहणारा आणि काळाच्या ओघात आपली स्वप्ने आपल्या विद्यार्थ्यांमध्ये पेरणारा आधुनिक सांदीपानी पाहुन मी थक्क झालो.

विद्यार्थ्याला हाताला धरून वक्तृत्वसंधीच्या प्रांगणात घेवून जाणारे, नाटकांच्या तालमीसाठी प्रचंड मेहनत घेणारे मराठी बेहोश होवून शिकवणारे आणि इतिहास त्वेषाने विद्यार्थ्यांसमोर मांडणारे तुम्ही, विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव करून देत असताना विद्यार्थ्यांसोबतच सामाजिक कार्यात सहभाग घेणारे तुमच्या सारखेच शिक्षक आम्हाला लाभले यातच आमचे यश सामावले आहे.

म्हटले तर हा माझाच आत्मसंवाद आहे, माझ्यासाठी पण यातही तुम्ही नक्कीच व्यवस्थीत सापडणार नाहीत. कारण कर्तृत्वासाठी आघाडीवर आणि श्रेया साठी खूप अदृश्य होत जाणे हा तुमचा स्वभावच आहे तुम्हाला फारसे पुरस्कार मिळाले नाहीत याची मला कधीच खंत वाटत नाही. पुरस्कारासाठी अर्ज करणे तुम्हाला मान्य नाही आणि पुरस्कार योग्य माणसांजवळ होवून येणे यासाठी ह्या देशात व्यवस्था नाही तरीही तुम्ही म्हणताच की विविध क्षेत्रातील माझे विद्यार्थी हेच माझे पुरस्कार.

तुम्हाला खुपदा भेटावेसे वाटते, चर्चा करावी वाटते. कधी कधी शक्य ही होत नाही पण तुमचे संस्कार अखंडीत सोबत देत असतात. राष्ट्रसंत तुकडोजीमहाराज लिहिताता
गुरू शिष्य एकाच स्थळीचे। भिन्न नाहीत पाहता मुळीचे ॥ सुखसंवाद चालते भिन्नस्वरूपाचे। रंग रंगणी आणावया ||

तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि माणूस घडविण्याच्या तुमच्या उपक्रमाला शतशः प्रणाम.

आपला विद्यार्थी
सुशिलकुमार भागवत शिंदे
shinde.sushilkumar10@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button