Uncategorized

उजनी धरण पायथ्याच्या गावांमधील शेती व नळ योजना अडचणीत; माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना शेतकरी व पाणीपुरवठा संस्था प्रमुखांचे निवेदन.

विजय शिंदे

इंदापूर व माढा तालुक्यातील उजनी धरण पायथ्याशी असलेल्या भीमा नदी काठच्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या सहकारी तत्त्वावरती तसेच वैयक्तिक उपसा जलसिंचन योजना गेली 30-35 वर्षांपासून सुरू आहेत. मात्र अलीकडच्या दहा-बारा वर्षांपासून उन्हाळ्यामध्ये नदीपात्र कोरडे पडत असल्याने नदीकाठची शेती व नळ पाणी पुरवठा योजना धोक्यात आल्या आहेत, त्यामुळे भीमा नदी पात्रामध्ये उन्हाळ्यात मार्च, एप्रिल, मे महिन्यात पाणीसाठा असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी इंदापूर येथे केले.


हर्षवर्धन पाटील यांची श्री भैरवनाथ सुरवड-भांडगाव सहकारी पाणी पुरवठा संस्था, अवसरी सहकारी पाणी पुरवठा संस्था, श्रीनाथ सहकारी पाणी पुरवठा संस्था, या सहकारी तत्त्वावरील पाणी पुरवठा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच भीमा नदीकाठच्या इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी भीमा नदीपात्रामध्ये उन्हाळ्यात पाणीसाठा असणे संदर्भात भेट घेऊन निवेदन दिले व चर्चा केली. दरम्यान, यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सु. स. खांडेकर अधिक्षक अभियंता उजनी धरण सोलापुर यांचेशी दूरध्वनी वरून चर्चा करून शेतकऱ्यांच्या या मागणी संदर्भात शासन दरबारी तसेच कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्याची सूचना केली.


हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, भीमा नदी पात्रातील नैसर्गिक पाणी प्रवाहावरती जलसंपदा विभागाने इंदापूर तालुक्यात सहकारी तत्वावर व हजारो शेतक-यांना वैयक्तिक पाणी परवाने दिलेले आहेत. या सहकारी संस्थांनी व शेतकऱ्यांनी वैयक्तिक कर्ज घेऊन कष्टाने पाईप लाईन केल्या आहेत. मात्र अलीकडच्या दशकात उन्हाळ्यात तीन-चार महिने भीमा नदी पात्र कोरडे पडत असल्याने उजनी धरण्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमधील शेती पिके व गावच्या पिण्याच्या नळ पाणीपुरवठा योजना अडचणी येत आहेत. त्यामुळे उजनी धरणाच्या पायथ्याखालील गावांमधील शेतकऱ्यांना व नागरिकांना पूर्वीच्या नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार आताही उन्हाळ्यातील मार्च, एप्रिल, मे व जून या महिन्यामध्ये नदीपात्रामध्ये पाणी असणे हे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवश्यक आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सुमारे 150 ते 200 क्युसेसने भीमा नदी पात्रात उजनीतून पाणी प्रवाह चालु ठेवावा, त्यामुळे भीमा नदी पात्रात पाणीसाठा उपलब्ध होईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, इंदापूर तालुक्यात सहकारी उपसा जलसिंचन योजना शेतक-यांच्या कष्टाने उभ्या केल्या आहेत. पाण्याभावी या संस्था सातत्याने अडचणीत येत असल्याने, अशा संस्था परत उभ्या करणे शक्य नाही. उजनी धरण उशाला असुनही धरणाच्या पायथ्याखालील शेती कोरडवाहू होण्याची भीती यावेळी शेतकऱ्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याकडे बोलून दाखवली. उजनी धरण्याच्या पायथ्याशी असलेल्या शेतक-यांना सिंचनासाठी पूर्वीप्रमाणे भीमा नदी पात्रातून बारमाही पाणी मिळणे हा आमचा हक्क असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी नमूद केले.

शेतकरी करतात प्रतिवर्षी रू. 50 लाख खर्च!

श्री भैरवनाथ सुरवड-भांडगाव सहकारी पाणी पुरवठा या संस्थेतील शेतकऱ्यांनी शेती तारण ठेऊन जिल्हा बँकेकडुन 1.25 कोटी कर्ज घेतले व या संस्था उभी केली. संस्थेचा देखभाल खर्च, कामगार पगार, विज बील,जलसंपदा विभागाची पाणीपट्टी असा वार्षिक रू. 50 लाख खर्च सध्या शेतकरी करीत आहेत. यासाठी आम्हांला शासनाची कोणतीही मदत मिळत नाही. आमच्या एका उपसा सिंचन संस्थेमुळे 1 हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. तसेच जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चा-याचा प्रश्नही मिटला आहे. प्रारंभी संस्था सुरू झालेवर भीमा नदीपात्रात 12 महिने पाणी होते परंतु गेली 10 वर्षे नदी पाञ मार्च पासून कोरडे पडत आहे, अशी माहिती यावेळी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय घोगरे, निरा भिमा कारखान्याचे उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे आदींनी दिली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button