इंदापूर पं. स. सभापती-उपसभापती कोण.?

विजय शिंदे.
नुकत्याच पार पडलेल्या इंदापूर पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दणदणीत विजय मिळवून सत्ता काबीज केली आहे. या विजयानंतर आता सर्वांचे लक्ष सभापती व उपसभापती पदी कोणाची वर्णी लागणार, याकडे लागले आहे.विशेष म्हणजे, सभापतीपद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने अनिता सोनवणे, हर्षवर्धन लोंढे, जोश्नना सुरडकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
इंदापूर तालुक्यात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील एकत्र आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली होती एकतर्फी झालेल्या या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ८ व पंचायत समितीच्या १६ जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वालचंदनगर बोरी गटातील वालचंदनगर गणातून अनिता सोनवणे या विजयी झाल्या आहेत, सोनवणे यांचे पती डॉ नंदकुमार सोनवणे यांनी यापूर्वी इंदापूर पंचायत समितीचे सभापती पद भूषवले आहे. तर लासूर्णे गणातून हर्षवर्धन लोंढे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे तर सनसर गणातून जोशना सुरडकर यांनी विजय मिळवला आहे.
त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात टाकणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
उपसभापती पदासाठी कोणाची वर्णी.?
तर उपसभापती पदासाठी भिगवन गणातील हेमा माडगे, वडापुरी गणातील अर्चना खबाले, लुमेवाडी गणातील शिवाजी मोहिते, बिजवडी गणातील दिलीप भिसे यांच्या नावाची चर्चा आहे.युवकांना संधी देण्याचे धोरण ठरले तर उपसभापती पदासाठी श्रीराज दत्तात्रय भरणे यांच्याही नावाची चर्चा होऊ शकते, श्रीराज भरणे हे बोरी गणातून जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी निवडून आले आहेत.
उपसभापती पदासाठी वडापुरी गणातील अर्चना अजित खबाले यांना संधी मिळावी अशी मागणी वडापुरी गणातील ग्रामस्थांनी केली आहे, यापूर्वी या गनातून ऋतुजा ताई पाटील निवडून आल्या होत्या त्यांनी पंचायत समितीचे सभापती पद भूषविले आहे त्यानंतर वडापुरी गणातील सदस्याला पंचायत समितीचे सभापती उपसभापती होण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे खबाले यांच्या रूपाने इंदापूर तालुक्यातील पूर्व भागाला संधी मिळावी अशी मागणी होत आहे.
सभापती व उपसभापती पदाची निवड करताना योग्य प्रतिनिधित्व, सामाजिक समतोल,अनुभव, पक्षनिष्ठा आणि आगामी राजकीय समीकरणे या सर्व बाबींचा विचार करावा लागणार आहे. पंचायत समिती ही ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची संस्था असल्याने नेतृत्व सक्षम आणि सर्वसमावेशक असावे,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एकूणच,राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी सभापती व उपसभापती पदासाठी अंतर्गत स्पर्धा चुरशीची ठरणार असून अंतिम निर्णयाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



