इंदापूर

इंदापुरात शेणखतासाठी वेटिंग, मागणी वाढली.!!म्हशीच्या शेणखताला अधिक मागणी.

विजय शिंदे

शेती वाचवण्यासाठी, फळबागांचे वाढलेले प्रमाण, शेतजमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेणखताचा वापर महत्त्वाचा असून, शेतकरी मिळेल त्या किमतीला शेणखत विकत घेऊ लागले आहेत. इंदापूर तालुक्यातील विविध गावांतील शेतकर्‍यांकडून शेणखताला मागणी वाढली आहे.

जनावरांना लागणारी वैरण, सुग्रास, पेंड आणि औषधे, मजुरीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामानाने दुधाचे दर वाढत नाहीत. दूध धंदा परवडत नसल्यामुळे शेतकर्‍यांनी जनावरे पाळणे कमी केले.

परिणामी गाई, म्हशींपासून मिळणारे शेणखत बंद झाले. याचा फटका शेतीला बसला आहे. शेतकर्‍यांना शेणखताचे महत्त्व लक्षात आले असून पुन्हा मिळेल तिथून आणि मिळेल त्या किमतीत शेणखत विकत घेऊन ते शेतात टाकले जात आहे.

एक टॅली शेणखत शेतात पांगविण्यासाठी मजुरांना एक हजार हजार रुपये, शेणखताची किंमत ६ हजार रुपये, शेणखत ट्रॅक्टर भरण्यासाठी १५०० रुपये मजुरी, असा ८ हजार ५०० रुपये खर्च होतो.

या खताला ऊस उत्पादक शेतकरी, द्राक्ष बागायतदार व भाजीपाला पिके घेणार्‍या शेतकर्‍यांकडून मागणी वाढत आहे. बांधावर टाकलेले खत शेतात पसरवण्यासाठी मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मोठे शेतकरी केवळ दुभत्या गाई _ म्हशी शेणखतासाठी पाळू लागले आहेत.

इंदापूर तालुक्यात भाटनिमगाव, अवसरी, बाभुळगाव ,भांडगाव येथे वाड्या- वस्त्यांपर्यंत जाऊन शेतकरी शेणखत गोळा करू लागले आहेत.

काही दिवसांवरच खरीप हंगाम आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग खरीप हंगाम पूर्व मशागतीसाठी सुरू आहे. वर्षभरात उन्हाळ्यामध्येच शेतकऱ्यांना शेतामध्ये शेणखत टाकता येते. त्यामुळे सध्या शेतकरी शेणखत टाकण्याच्या कामाला प्राधान्य देत आहेत. मिळेल तिथून अधिकाधिक शेणखत विकत घेऊन टाकत आहेत.सध्या शेणखताच्या एका ट्रॉलीला सहा हजार रुपये मोजावे लागत आहेत.

चांगले कुजलेले शेणखत फायदेशीर

शेणखत हा सेंद्रिय कर्ब व जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. चांगले कुजलेले शेणखत फायदेशीर ठरते. सेंद्रिय खतामुळे जमिनीचा पोत सुधारतो, माती भुसभुशीत राहून हवा-पाणी यांचे परिवहन होऊन मातीचा जिवंतपणा टिकविला जातो.

भाटनिमगाव येथे माझा ५० म्हशी व १५ गाईंचा गोठा आहे या ठिकाणी म्हशीच्या शेण खताला मागणी अधिक असल्याने शेजारील गावातील शेतकरी शेणखतासाठी मोठी मागणी करत आहेत.

भागवत शिंदे
दूध उत्पादक शेतकरी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button