Uncategorized

साधू भिक्षुकाचा वेष परिधान करून संमोहनाद्वारे लुटणाऱ्या दोघांना पकडले.

ग्रामस्थांची सतर्कता ठरले महत्त्वाची.

विजय शिंदे

इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीमध्ये साधू भिक्षुकाचा वेष परिधान करून संमोहनाद्वारे लूटमार करणाऱ्या पंजाब राज्यातील दोन तरुणांना ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

मनी फर्नेश नाथ आणि अर्जुन साथ नाथ (दोघे रा. शेरपूर, ता. धुरी, जि. संगरूर, पंजाब) अशी पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या तरुणांची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी (दि.९) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार निमगाव केतकी येथील संत सावतामाळी प्रतिष्ठानच्या व्यापारी गाळ्यातील सचिन धन्यकुमार दोषी यांच्याकडे मनी व अर्जुन नाथ हे दोघे गेले. तेथे दोषी हे एकटेच होते. दोषींना कोपऱ्यात नेत त्यांना संमोहित केले आणि त्यांना अंगठ्या काढून पाकीट देण्यास भाग पाडले. सुदैवाने याचवेळी तेथे उत्तम भोंग, तुकाराम भोसले हे दोघे आले. त्यामुळे दोघांनी त्यांना आत येण्यास प्रतिबंध केला. मात्र भोसले यांनी हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये चित्रित करण्यास सुरुवात केली असता त्या दोघांनी ऐवज टाकून तेथून पळ काढला.

ही घटना पोलिस पाटील अतुल डोंगरे यांना समजताच त्यांनी तत्काळ संबंधितांची छायाचित्रे गावातील सर्व सोशल मीडिया ग्रुपवर व्हायरल केले. काही वेळातच पोलिस पाटील डोंगरे यांना ते दोघे आमच्या भागात आल्याचे मोबाईलवरून कळविण्यात आले. त्यानुसार ग्रामस्थांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

दरम्यान इंदापूरचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी जीवन बनसोडे यांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून त्या दोघांना मूळ गावी रवाना केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button