इंदापूरच्या राजकीय चिखलात “कमळ” फुलणार.?
विजय शिंदे
पुणे जिल्हा परिषद व इंदापूर पंचायत समिती निवडणूक यंदा राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची नव्हे, तर अस्तित्वाची लढाई झाली आहे. राजकीय पक्षातील गट-तट आणि व्यक्तिकेंद्रित राजकारण अधिक प्रभावी ठरत असून, उमेदवारीवरून उफाळलेल्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची डोकेदुखी वाढली आहे, इंदापूर मध्ये झालेल्या युती आघाडीच्या राजकीय चिखलात कमळ फुलणार अशी चर्चा आता ग्रामीण भागात सुरू आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन राष्ट्रवादी एकत्र आल्याने इंदापूर तालुक्यात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एकत्र येत जिल्हा परिषदेसाठी ८ तर पंचायत समितीसाठी १६ उमेदवारांना राष्ट्रवादीच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावर उभे केले आहे.तर दुसरीकडे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती व भाजप नेते प्रवीण माने, ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने ही संपूर्ण पॅनल उभा केला आहे.
अनेक जिल्हा परिषद मतदारसंघांत पक्षाने डावललेल्या कार्यकर्त्यांनी थेट भारतीय जनता पक्षाचा झेंडा हातात घेऊन मैदानात उतरून पक्षाने दिलेल्या अधिकृत उमेदवारांपुढे कडवे आव्हान उभे केले आहे.उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत मंगळवारी (दि. २७) आहे. त्यामुळे मैदानात अडचणीचे ठरणाऱ्या उमेदवारांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रवादी सोबतच भाजपच्याही नेत्यांनी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे.विशेष म्हणजे, काही मतदारसंघांमध्ये पक्षसंघटनेचा कणा असलेल्या दुसऱ्या,तिसऱ्या फळीतील नेते व कार्यकर्ते उमेदवारी नाकारल्याने संतप्त झाले आहेत.
‘पक्षासाठी आयुष्य घालवले, मात्र ऐनवेळी बाहेरच्यांना संधी दिली’, असा आरोप करत काहींनी भाजपचा तर काहींनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडाचे निशाण फडकावले आहे. काही संवेदनशील मतदारसंघांमध्ये तर बंडखोर उमेदवार थेट विजयी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.हा धोका स्थानिक नेत्यांना माहित आहे. त्यामुळे आपला अधिकृत उमेदवार पराभूत होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.अनेक बंडखोर उमेदवारांनी माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला असून ‘आता मागे हटणार नाही’, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. काही ठिकाणी वैयक्तिक प्रतिष्ठा, तर काही ठिकाणी स्थानिक सत्तासंघर्षांमुळे माघार घेणे अशक्य बनले आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय नाट्य रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या निवडणुकीचा निकाल केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांपुरता मर्यादित न राहता आगामी राजकीय समीकरणांवरही दूरगामी परिणाम करणारा ठरेल, असे जाणकारांचे मत आहे.
अडचणीचे ठरणाऱ्या उमेदवारांना माघार घेण्यासाठीअनेक प्रकारचे अमिषे.
निवडणूक रिंगणात उतरलेल्या मात्र काही उमेदवारांना अडचणीचे ठरणाऱ्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी अनेक प्रकारचे अमिषे दाखवली जात आहेत. काहींना आर्थिक तर काहींना पदांची आश्वासने दिली जात आहेत. नेत्यांचा हा डाव कितपत यशस्वी ठरतो है,माघारीनंतर दिसून येणार आहे.
दोन मतदारसंघात हाय व्होल्टेज लढत..
इंदापूर तालुक्यातील काटी लाखेवाडी व माळवाडी वडापुरी या जिल्हा परिषद गटात हाय व्होल्टेज लढत होणार आहे, काटी लाखेवाडी गटात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे विश्वासू सहकारी विलासराव वाघमोडे यांनी उमेदवारी न मिळाल्याने नाराज होत भाजपचा झेंडा हाती घेतला असून त्यांनी राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत ढोले यांच्या पुढे मोठे आव्हान उभे केले आहे, तर दुसरीकडे दत्तात्रय भरणे यांचे सहकारी कार्यकर्ते पंचायत समितीचे माजी सदस्य सतीश (गोटू)पांढरे यांनी वडापुरी माळवाडी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत भाजपचा झेंडा हाती घेत अधिकृत उमेदवार यशराज जगदाळे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. या लढतीकडे इंदापूर तालुक्याचे लक्ष आहे.



