शेखर पाटील व मनीषा शिंदे यांच्या अपक्ष उमेदवारीने प्रभाग क्रमांक ३ मध्ये लक्षवेधी लढत.
विजय शिंदे
इंदापूर नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीत चांगलीच रंगत भरू लागली असून अपक्ष व बंडखोर उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर नगरपरिषद निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व कृष्णा-भीमा विकास आघाडी यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार आहे.
प्रभाग क्रमांक ३ मधून शेखर अशोकराव पाटील व मनीषा पांडुरंग शिंदे यांच्या अपक्ष उमेदवारीने प्रभाग ३ मध्ये चांगलीच रंगत आली असून लक्षवेधी लढत या प्रभागात पाहायला मिळणार आहे. शेखर पाटील यांनी यापूर्वी इंदापूर नगर परिषदेमध्ये सर्वात कमी वयाचे नगरसेवक म्हणून काम केले आहेत. तर यापूर्वी मनीषा शिंदे यांनीही नगरसेवक म्हणून काम केले आहे.शिंदे व पाटील हे कृष्णा भीमा विकास आघाडी कडून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. परंतु ऐनवेळी उमेदवारी डावल्याने दोघांनीही अपक्ष अर्ज दाखल केले आहेत.
यावेळी शेखर पाटील यांच्याशी बोलताना ते म्हणाले इंदापूर शहरात प्रभाग क्रमांक तीन मध्ये माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग शिंदे, मनीषा शिंदे व मी स्वतः अनेक वर्ष झाले काम करत आहे, नगरपरिषद प्रशासनाचा आम्हा दोघांनाही अनुभव आहे, त्यामुळे ही निवडणूक लढवण्याचा निर्णय आम्ही घेतला असून प्रभाग क्रमांक तीन मधील जनता आम्हाला मतदान रुपी आशीर्वाद देईल यात तिळ मात्र शंका नाही. प्रभागातील स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा, नागरिकांच्या आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा, प्रभागामध्ये कायमस्वरूपी स्वच्छता, ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्क,विश्रांती ग्रह, लहान मुलांसाठी अद्यावत क्रीडांगण, बंदिस्त आणि व्यवस्थित गटारी,चांगल्या दर्जाचे अंतर्गत रस्ते आणि पथदिवे,आकर्षक सुशोभीकरण हे आमचे प्रमुख संकल्प आहेत.



