शिवाजी महाराजांचे मावळे “कडू” गवतात उभे; प्रदीप गारडकर यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना विकास कामावरून डिवचले.
विजय शिंदे
बारामती तालुक्यात कामे दर्जेदार होतात कारण उपमुख्यमंत्री अजित पवार हे आलेल्या निधीची झालेल्या कामांची स्वतः पाहणी करतात, लाज वाटली पाहिजे मालोजीराजे यांची समाधी स्थळ असलेले इंदापूर शहर सांगताना, तुम्ही पुण्यावरून निघाला तर इंदापूर मध्ये आल्यानंतर शिवाजी महाराजांचे मावळे तुम्हाला कडू गवतात उभे दिसतील, एवढी निकृष्ट व दर्जाहीन कामे इंदापूर शहरात सुरू आहेत असे म्हणत कृष्णा भिमा विकास आघाडीचे इंदापूर नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप गारटकर यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका केली आहे.
यावेळी बोलताना गारटकर म्हणाले इंदापूर शहरातील कोणत्याही कामात आम्ही प्रशासनातील अधिकाऱ्याला फोन केला तर त्या ठिकाणी सांगून ठेवलेले असायचे की “याचे” काही ऐकायचे नाही हे सांगतोय याच्या उलट काम करायचे ह्या गोष्टीला आम्ही कंटाळलो होतो.
भरत शहा आमचे टार्गेट नाही..
यावेळी बोलताना प्रदीप गारटकर म्हणाले भरत शहा हे आमचे टार्गेट नाही तर इंदापूर तालुक्यात चाललेले राजकारण, चांगल्या कार्यकर्त्याला पद्धतशीरपणे बाजूला काढायचे, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय करायचा याच्या विरोधात आमची लढाई आहे.
शहा विरुद्ध गारटकर थेट सामना
इंदापूर नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अ प) पक्षाने माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, या उमेदवारीला गारटकर यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. या नाराजीतून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भरत शहा यांच्या विरुद्ध निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी शहा विरुद्ध गारटकर थेट सामना रंगणार आहे.



