Uncategorized

“सर” असतील तर “बापूच” बरं; शेठ”पण सोपा नाही..!!

विजय शिंदे

इंदापूर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी जोरदार सुरू आहे.कृषिमंत्री दत्तात्रय भरणे,माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील,भारतीय जनता पक्षाचे प्रवीण माने यांच्या नेतृत्वाची कसोटी या निवडणुकीत लागणार आहे.

माजी मंत्री पाटील यांचा बालेकिल्ला महणून ओळख असलेल्या बावडा लाखेवाडी व वडापुरी काटी गटाची मोडतोड होऊन काटी-लाखेवाडी जिल्हा परिषद गट नव्याने निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षातून अनेक चेहरे प्रमुख दावेदार आहेत. त्यामुळे नेमका प्रबळ उमेदवार कोण याची चर्चाही आता पारा पारावर सुरू झाली आहे.

जिल्हा परिषद गटासाठी सर्वसाधारण आरक्षण आल्याने व काटी पंचायत समिती गणात सर्वसाधारण तर लाखेवाडीत पंचायत समिती गणात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे आरक्षण जाहीर झाले असल्याने येथे उमेदवारी देताना आणि त्यांना विजयी करताना नेत्यांची कसोटी लागणार आहे.

इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव वाघमोडे व हर्षवर्धन पाटील यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक बावडा लाखेवाडी गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीमंत ढोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे यांच्यातच उमेदवारीसाठी खरी स्पर्धा दिसून येत आहे.
पाटील आणि भरणे उमेदवारीसाठी नेमका कोणता डाव खेळणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.काटी लाखेवाडी जिल्हा परिषद गटासाठी आणि पंचायत समिती गणांसाठी भाजपाचे प्रवीण माने देखील या गटात भाजपाचे उमेदवार उभे करून पक्षाची ताकद दाखवून देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.

सर असतील तर बापूच बरं..

गट गण रचना होताना नव्याने बनवलेला काटी लाखेवाडी हा गट श्रीमंत ढोले सर यांच्यासाठी बनवला असल्याची चर्चा सर्व तालुक्यात अनेक दिवसापासून सुरू आहे, समोरून राष्ट्रवादीकडून श्रीमंत ढोले यांना उमेदवारी मिळाली तर तालुक्याच्या राजकारणातली माहिती असलेले मुरब्बी राजकारणी विलास वाघमोडे स्वतः मैदानात उतरावेत अशी इच्छा अनेक कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.विलासराव वाघमोडे हे निरा भिमा सहकारी कारखान्याचे अनेक वर्ष पदाधिकारी राहिले आहेत या गटात निरा भिमा कारखान्याचे मोठे कार्यक्षेत्र आहे.

श्रीमंत ढोले यांनी हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडल्यानंतर पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असून श्रीमंत ढोले यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिल्यास त्यांच्याविरोधात हर्षवर्धन पाटील यांच्याकडून विलासराव वाघमोडे यांना उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांची होत आहे.हा गट सर्वसाधारण असला तरी ओबीसी मताचा अधिक प्रभाव असल्याने धनगर,माळी, वंजारी, मराठा असे समीकरण साधत इतर मतांची मोट बांधावी लागणार आहे.

विलासराव वाघमोडे यांच्याकडे अनेक निवडणुका लढवण्याचा अनुभव आहे, स्थानिक स्वराज्य संस्था,सहकारी संस्थेवर सर्वाधिक काळ त्यांनी काम केले आहे. हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी मुलुख मैदानी तोफ अशी विलासराव वाघमोडे यांची ओळख आहे,तर श्रीमंत ढोले यांनी बावडा लाखेवाडी गटात जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व केले असून राज्यभरातील नामांकित शिक्षण संस्था ते आता सध्या चालवण्यात यशस्वी झाले आहेत, एकत्र काम केल्याने विरोधातील कार्यकर्त्यांशी ही त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत, सर्व शक्तीनिशी निवडणूक लढवण्यात ते माहीर आहेत.

शेठ”पण सोपा नाही..

काठी लाखेवाडी गटातून राष्ट्रवादीकडून दुसरे इच्छुक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुलशेठ झगडे यांच्याही नावाचा विचार करावा असा एक मोठा वर्ग या गटात आहे, जुन्यांना विश्रांती द्या व नवीन निष्ठावंत चेहऱ्याला संधी द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस मधील कार्यकर्ते करत आहेत.

अतुल झगडे हे झगडेवाडी गावचे सरपंच असून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे जवळचे सहकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, त्यांच्या पत्नी रूपाली झगडे या झगडेवाडी गावच्या बिनविरोध सरपंच होत्या. ओबीसी समाजातील अतुल झगडे यांचे सर्व समाजातील मतदारांशी चांगले संबंध आहेत, निवडणूक लढवण्यासाठी लागणारे सर्व साधन त्यांच्याकडे आहे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून झगडे यांचा परिचय आहे, यापूर्वी इंदापूर तालुका विद्युत वितरण समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. निवडणुकीपूर्वी किंवा या निवडणुकीनंतर त्यांच्याकडे महत्त्वाचे जबाबदारी मिळण्याचे संकेतह मिळत आहेत.

इच्छुकांची संख्या ही मोठी..

ॲड कृष्णाजी यादव, राजकुमार जाधव, तानाजी नाईक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हेमंत पाटील, साहेबराव मोहिते, लाखेवाडी गावच्या सरपंच चित्रलेखा ढोले, माजी सभापती स्वाती बापूराव शेंडे, वरकुटे खुर्दचे सरपंच बापूराव शेंडे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांचे शेटफळ हवेली हे गाव या गटात असल्याने ते देखील रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नीलकंठ मोहिते हे पण इच्छुक आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button