इंदापुरात तेरी भी चुप और मेरी भी चुप.. कोणाला काही बोलू नका..

विजय शिंदे
इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव येथे उभारण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमिनीचा ताबा घेत असताना. अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्थानिक लोकांनी विरोध केला. या भागात अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली त्या भागात अनेक धनदांडग्यांची अतिक्रमणे असून अतिक्रमण केलेली शेती ओलिताखाली आहे.
मात्र संबंधित धनदांडग्यांची अतिक्रमणे वाचवून गोरगरीब लोकांची घरे प्रशासनाकडून उध्वस्त केली गेल्याचा आरोप हा स्थानिकांकडून होत आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या अन्यायग्रस्त पारधी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आवाज उठवणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.इंदापूर शहर व ग्रामीण भागात प्रशासनाकडून अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू आहे. परंतु राजकीय हस्तक्षेपाने, राजकीय आकसापोटी तोंड पाहून अतिक्रमणे काढली जात असल्याची चर्चा शहर व ग्रामीण भागात जोरात सुरू आहे.ज्यांना लोकसभेला व विधानसभेला सर्वसामान्य लोकांनी मतदान करून लोकसभा व विधिमंडळात पाठवले ते खासदार सुप्रिया सुळे व मंत्री दत्तात्रय भरणे या घडलेल्या प्रकारावरती काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांच्या नजरा लागले आहेत.
ज्या पारधी समाजाची घरे जमीनदोस्त करण्यात आली त्यांचे पुनर्वसन करणार का असाही प्रश्न समोर येऊ लागला आहे. इंदापूर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय विरोधकांची कमतरता सामान्य जनतेला भासू लागली आहे .जनतेच्या बाजूने आवाज उठवण्यासाठी कोणताही नेता अथवा पक्ष समोर येताना दिसून येत नाही. इंदापूर तालुक्यात सर्वच पक्ष सत्ताधारी आहेत असे दिसू लागले आहेत. यामुळे जनतेच्या बाजूने आवाज उठवणारा विरोधक आवाज उठवताना दिसून येत नाही.उद्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावरती येणार आहेत. त्या बाभुळगाव येथील पारधी समाजाच्या वस्तीला भेट देऊन झाले गेलेल्या प्रकाराबाबत या भटक्या समाजातील लोकांसाठी आवाज उठवणार का…? त्यांचे प्रश्न लोकसभेत मांडणार का..? त्यांना पर्यायी जागेसहित हक्काची घरे मिळवून देणार का..? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
इंदापूर तालुक्यात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले प्रवीण माने हे विधानसभेचे चेहरे मानले जातात, नुकताच इंदापूर तालुक्यातील बाबुळगाव येथे पारधी समाजातील नागरिकांची घरे उध्वस्त करण्यात आली. यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी हे तिन्ही नेते प्रयत्न करणार .? अशी चर्चा सुरू आहे.
राष्ट्रवादी –भाजप सत्ताधारी तर विरोधी पक्ष आहेत कुठे.?
इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना,भारतीय जनता पक्ष एकत्रित सत्तेत आहे परंतु इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष मात्र विधानसभा निवडणुकीनंतर जनतेचे प्रश्न मांडताना कुठेही दिसून येत नाही अशी चर्चा आहे. इंदापूर तालुक्यातील मतदारांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना सर्वाधिक मतदान करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना नाकारलं होतं, परंतु खासदार सुप्रिया सुळे या इंदापुरातील अतिक्रमण मोहिमेवर काय बोलणार.? आगामी काळात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका काय असणार.? पारधी समाजाला पर्यायी जागा व घर उपलब्ध करून देणार का.? या प्रश्नांकडे सर्वांचे लक्ष असेल.



