Uncategorized

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चा होणार.?

विजय शिंदे

“दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र यावं, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे”, असं माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. तेव्हा पासून अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का? यावर चर्चा सुरू झाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी हे विलिनीकरण होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. दरम्यान, विलिनीकरणाच्या या चर्चा सुरू असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मुंबईत (आज १४) पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. पक्षाच्या महाराष्ट्र युनिटने या बैठकीला हजर राहण्याचे आदेश पदाधिकारी आणि जिल्हा समन्वयकांना दिले आहेत.

“सर्व राज्य नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून घेतली जाईल. आम्हाला बैठकीच्या अजेंड्याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही, परंतु वेळेवर बैठकीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे”, असे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) च्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. या बैठकीत राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर चर्चा होण्याची शक्यता आहे, असंही त्यांनी सांगितले.

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत पवार म्हणाले होते की, पक्षाच्या काही कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीत (अजित पवार) सामील होण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे निर्णय घेतील, असं पवार म्हणाले. तर सुप्रिया सुळेंना याबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या, याबाबतचा निर्णय नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच घेतला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button