छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीसाठी पृथ्वीराज घोलप रिंगणात.

रविवार, दि. १८ मे २०२५ रोजी मतदान असल्यामुळे श्री छत्रपती सह. साखर कारखाना लि., भवानीनगर ता. इंदापूर जि. पुणे संचालक मंडळ २०२५-३० च्या पंचवार्षिक निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना सध्या सर्वात जास्त चर्चेत असणारे नाव म्हणजे पृथ्वीराज श्रीनिवास घोलप. इंदापूर तालुक्यातील मौजे घोलपवाडी येथे त्यांची ऊस आणि द्राक्ष या मुख्य पिकांची शेती असून बारामती शहरामध्ये त्यांचा मुख्य व्यवसाय आहे.
इंदापूर तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय राजेंद्रकुमार घोलप हे पृथ्वीराज यांचे चुलते होते आणि ते छत्रपती कारखान्यावरती सलग दहा वर्ष चेअरमन पदी विराजमान होते त्यामुळे पृथ्वीराज यांना लहानपणी पासूनच सामाजिक क्षेत्राची आवड निर्माण झाली होती परंतु कुटुंबांमध्ये इतर वरिष्ठ लोकांना साथ देत असल्यामुळे पृथ्वीराज हे कधीच लोकांसमोर आले नाहीत.
एक सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित तरुण म्हणून पृथ्वीराज यांची ओळख असल्याने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच इंदापूर तालुक्याचे आमदार आणि क्रीडा व अल्पसंख्याक राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पृथ्वीराज बापू जाचक यांच्या नेतृत्वामध्ये श्री जय भवानी माता पॅनल मध्ये पृथ्वीराज घोलप यांना संचालक मंडळावरती जाण्यासाठी त्यांचा विचार करून पक्षाने श्री जय भवानी माता पॅनल मधून त्यांना उमेदवारी जाहीर केली.
इंदापूर तालुक्यातून ३६ गावे आणि बारामती तालुक्यातून १७ अशी एकूण ५३ गावातील लोक छत्रपती कारखान्यांमध्ये सभासद म्हणून आहेत.खरंतर पृथ्वीराज श्रीनिवास घोलप यांची इंदापूर तालुक्यात असणाऱ्या शेतीमुळे आणि बारामती मध्ये व्यवसाय असल्याने त्यांची या दोन्हीही तालुक्याशी नाळ जोडली गेलेली आहे. साधा आणि सरळ मार्गी चालणारी व्यक्ती, लहानपणापासूनच थोरा-मोठ्यांमध्ये मिळून मिसळून आणि सर्वांशी नम्रतेने वागण्याचा त्यांचा स्वभाव आहे. विरोधी किंवा आपला असा कधीही भेदभाव ते करीत नसून जो कोणी त्यांच्याजवळ जाईल त्यांना ते आपलेसे करतात आणि त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावून जातात असे लोक सांगतात.
पृथ्वीराज यांच्याकडून युवा वर्गाच्या खूप अपेक्षा आहेत आणि घोलप कुटुंबाचा नवीन युवक आणि स्वच्छ प्रतिमेचा उगवता तारा म्हणून त्यांना वर्तविले जात आहे.पृथ्वीराज हे वृद्ध, गरजू आणि युवकांच्या अडचणीसाठी नेहमी धावत जातात. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून अनेक युवकांना आपल्या सोबत घेऊन गोरगरीब आणि वृद्ध तसेच गरजूंना पडेल ती मदत करण्याचे सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांना इंदापूर तालुक्यातून मोठी राजकीय पार्श्वभूमी मिळण्याचे संकेत असल्याचे त्या ठिकाणी बोलले जात आहे.पृथ्वीराज घोलप हे तरुण युवक आणि तडफदार नेतृत्व असल्यामुळे तसेच त्यांचे चुलते स्वर्गीय घोलप साहेब यांच्या विचारांचा वारसा सोबत घेऊन छत्रपती कारखाना सुस्थितीत चालण्यासाठी आणि चांगले दिवस पाहण्यासाठी घोलप साहेबांप्रमाणे सर्व संचालक मंडळ, सभासद आणि कर्मचारी वर्ग यांना सोबत घेऊन चालण्याचा मानस पृथ्वीराज यांचा आहे असे त्यांनी सांगितले.



