पिंपरी खुर्द शिरसोडी ग्रुप ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच राजेंद्र चोरमले यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर.

विजय शिंदे.
सरपंच विश्वासात घेत नाहीत, गावाच्या विकासाची कामे करत नाहीत. सरपंच पंचायतीच्या ठरावाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करतात. सरपंच आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करीत आहेत. सरपंच मनमानी कारभार करतात. सरपंच सहकारी सदस्यांना अपमानकारक वागणूक देतात, सरपंच त्यांच्या कर्तव्यात कसूर करीत आहेत,अशी कारणे देत पिंपरी खुर्द शिरसोडी ग्रुप ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच राजेंद्र चोरमले यांच्याविरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांनी १५ एप्रिल रोजी तहसीलदारांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यानंतर तहसीलदारांनी २१ एप्रिल रोजी ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा आयोजित केली. त्यामध्ये सदस्यांनी ११ विरुद्ध १ मताने अविश्वास ठराव मंजूर केला.
तहसीलदारांनी या बाबत अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला, त्यानंतर अविश्वास ठरावाला संमतीबाबत पडताळणी करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र हृड्डी यांच्या आदेशान्वये सोमवारी (ता. ५) पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुड़े यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसोडी प्रांगणात विशेष ग्रामसभेचे आयोजन केले. त्यामध्ये सरपंचांवरील अविश्वास ठरावासाठी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले.
यामध्ये एकूण ३०२६ मतदारपैिकी १३६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये मतमोजणीवेळी विविध कारणांनी ५० मते अवैध ठरवण्यात आली, तर १३१३ मते वैद्य ठरविण्यात आली. त्यामध्ये अविश्वास ठरावाच्या बाजूने ७२५ तर अविश्वास ठरावाच्या विरुद्ध ५८८ मतदान झाले.त्यामुळे १३७ मतांनी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.
सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार विजय पुगे व सहाय्यक गटविकास अधिकारी संजय जगताप यांनी काम पाहिले. तसेच पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी महसूल अधिकारी, कर्मचारी व व पोलिस कर्मचारी यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी साहाय्य केले.



