आजीचे अश्रू अजूनही थांबत नाहीत, “दादा असा कसा जाऊ शकतो.? बाबा इतके भावूक झाले आहेत की..
विजय शिंदे
प्रिय काका,
आज तुम्हाला जाऊन एक महिना झाला… माझ्यासाठी, आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी, हा एक महिना आयुष्यातला सर्वात जड आणि सर्वात वेदनादायी ठरला.
आजही तुमच्या नसण्याची जाणीव मनाला होत नाही. तुम्ही तुमच्या रुबाबदार आवाजात येऊन म्हणाल, “मी कामाचा माणूस आहे, आणि हे काम असंच झालं पाहिजे!” असा भास होतो. सतत वाटत राहते आता तुमची गाठ पडेल… आणि तुम्ही म्हणाल, “काय चिरंजीव, कसं काय सुरू आहे? थांब थोडं, लोकांना भेटतो पहिले. मग आपण बोलू…” पण वास्तव समोर येतं आणि मन हेलावून जाते. आता मी तुमचे मार्गदर्शन कसे घेऊ…?
आजीचे अश्रू अजूनही थांबत नाहीत. त्या आजही तुमच्या विश्वात रमण्याचा प्रयत्न करतात. काका, तुम्ही आजीची काळजी करू नका, आम्ही सर्वजण त्यांची काळजी घेत आहोत.
बाबा इतके भावूक झाले आहेत की, त्यांचा बांध केव्हाही फुटतो. त्यादिवशी गाडीतून प्रवास करताना अचानक त्यांचे डोळे पाणावले. ते उद्विग्नपणे म्हणाले, “दादा असा कसा जाऊ शकतो? अजून बरंच काही बोलायचं होतं…” आदरणीय साहेबही तुमच्याशिवाय अस्वस्थ झाले आहेत.
काका, अपघाताबद्दलच्या अनेक शंका मनाला छळत आहेत. अपघात कसा काय होऊ शकतो? नेमकं काय घडलं? कोणामुळे घडलं? सत्य काय आहे? हे जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत.
सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सभागृहात तुमचा आवाज पुन्हा घुमणार नाही, तुमचा तो प्रभावी आवाका दिसणार नाही. यावर अजूनही विश्वास बसत नाही.
तुम्ही गेलात… काका तुम्ही महाराष्ट्राला पोरकं करून गेलात…
काका, तुम्ही शरीराने आमच्यात नसला तरी तुमची शिकवण, तुमचा ध्यास, तुमचा जनतेवरचा विश्वास आणि जनतेचा तुमच्यावरचा विश्वास आणि प्रेम कायम आहे.
मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही सुरू केलेलं काम, जनतेला दिलेला विश्वास आणि विकासाचा घेतलेला वसा कधीही थांबू देणार नाही.
तुमचा मार्गच आमचा मार्ग असेल.
तुमचं स्वप्नच आमचं ध्येय असेल.
तुमची उणीव कधीच भरून निघणार नाही… Miss you Kaka
तुमचाच,
युगेंद्र


