Uncategorized

पुणे जिल्हा परिषद निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; मतांमधील फूट टाळण्यासाठी अजित पवारांची खेळी.

विजय शिंदे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेवर लक्ष केंद्रीत केले. त्या प्रमाणे पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी देखील अजित पवार विशेष लक्ष देणार आहेत. मागील वेळी राष्ट्रवादीची सत्ता पुणे जिल्हा परिषदेवर होती. यावेळी देखील पुन्हा सत्ता मिळण्यासाठी अजित पवारांनी मोठी खेळी खेळल्याची माहिती आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ज्या प्रकारे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या त्या प्रमाणे जिल्हा परिषदेत देखील एकत्रच लढणार आहेत. मतांमधील फूट टाळण्यासाठी अजित पवारांनी ही खेळी खेळली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील याला हिरवा झेंडा दिल्याची चर्चा आहे.

बारामती लोकसभामतदारसंघात भाजपने मिशन लोटस राबवत संग्राम थोपटे, संजय जगताप यांच्यासारखे मोठे नेते आपल्या पक्षात घेतले. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत अजित पवारांना भाजप जड जाण्याच्या चर्चा होत्या. त्यात दोन्ही राष्ट्रवादीतील फूटीमुळे जिल्हा परिषद निवडणूकीत शरद पवारांचे उमेदवार अजित पवारांच्या उमेदवारांच्या विरोधात असण्याची शक्यता होती, त्यामुळे मते विभागण्याचा धोका होता.

इंदापूरचे राजकीय चित्र पालटणार..

इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे ८ गट असून पंचायत समितीचे १६ गण आहेत. यामध्ये कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची सूचना दिली असून तशी तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे. इंदापूर तालुक्यात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील एकत्र आल्यास इंदापूर तालुक्यातील राजकीय चित्र बदलणार आहे.

विधानसभा निवडणूक निकालानंतर पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत राहण्याची भूमिका घेतली होती, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांनी पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांची जबाबदारी दिली होती. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी पाटील यांच्याकडे होती.

इंदापूर तालुक्यात पाटील व भरणे एकत्र आल्यास भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रवीण माने व प्रदीप गारटकर हे आव्हान उभे करतील अशी शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button