इंदापुरात “इच्छुक” उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणी..

विजय शिंदे
इंदापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासूनच जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस तर पंचायत समितीवर हर्षवर्धन पाटील गटाचे वर्चस्व राहिले असून, याचे परिणाम येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील दिसणार आहेत.
इंदापूर तालुक्यातील ८ जिल्हा परिषद गट व १६ पंचायत समिती गणासाठी उमेदवारी मिळावी यासाठी दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सर्वाधिक रस्सीखेच होऊ शकते, त्यामधून होणाऱ्या बंडखोरीचा मोठा फायदा भारतीय जनता पक्षाला होणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेवर गेले अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे म्हणजे अजित पवारांचे वर्चस्व राहिले आहे. इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात आजही बहुतेक ग्रामपंचायती वर राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच बोलबाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीनंतर एक शरद पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि एक अजित पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी विभागणी झाली आहे. एकाच पक्षाचे दोन पक्ष होऊन नेतृत्व वेगवेगळे झाले असले तरी ग्रामीण भागात इतर पक्षांच्या तुलनेत इच्छुक उमेदवारांचा ओढा याच दोन पक्षांकडे सर्वाधिक असल्याचे लक्षात येते.
तालुक्यातील सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांनी आपल्या पक्ष नेतृत्वाकडे उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली असून आपले समर्थक कार्यकर्ते सोशल मीडियावर तसेच आपल्या पक्ष नेतृत्वाकडे उमेदवारीसाठी नाव सुचवतील अशी योजना आखली आहे.
यापूर्वी इंदापूर तालुक्यातील मतदारांनी आपली भूमिका वेळोवेळी बदलली असल्याचे दिसून येते, लोकसभा निवडणुकीत इंदापूर तालुक्यातील मतदारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आपला कौल दिला तर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला यश आले, विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांना पडलेली मते ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत.
इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे राज्य सरकारमध्ये कृषीमंत्री असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारीसाठी अधिक मागणी दिसून येत आहे. दत्तात्रय भरणे यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळावी अशी मानसिकता अनेक इच्छुक उमेदवारांमध्ये दिसत आहे. तर विरोधक असलेले माजी मंत्री राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व बांधकाम समितीचे माजी सभापती प्रवीण माने यांच्यामध्ये स्थानिक युती झाल्यास त्यांच्याकडेही उमेदवारीची अधिक पसंती होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पुणे जिल्हा परिषदे सह सोलापूर जिल्ह्याची तसेच राज्यातील वाशिम जिल्ह्याचीही जबाबदारी असणार आहे त्यामुळे इंदापूर तालुक्यात दत्तात्रय भरणे यांच्या सोबतच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे हे पक्षाचे पदाधिकारी निवडणुकीची रणनीती आखणार आहेत.
राष्ट्रवादी शरदचंद्रपवार पक्षाकडून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून असले तरी इंदापूर तालुक्यात त्यांच्या मदतीला तालुकाध्यक्ष ॲड तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, छत्रपती चे संचालक अँड शरद जामदार, निरा भिमाचे संचालक विलासराव वाघमोडे, कृष्णाजी यादव, सागर मिसाळ, संपत बंडगर, दत्तात्रय शिर्के आधी पदाधिकारी स्थानिक निवडणुकीत लक्ष देऊन आहेत.
तर भारतीय जनता पक्षाकडून भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, जिल्हा नियोजन चे माजी सदस्य माऊली चवरे, ज्येष्ठ नेते मारुती वनवे, पुणे जिल्हा महामंत्री आकाश कांबळे, ओबीसी आघाडी जिल्हा अध्यक्ष गजानन वायसे ,पूर्व मंडल अध्यक्ष राम आजबे, मध्य मंडल अध्यक्ष राजू जठार,पश्चिम मंडल अध्यक्ष तेजस देवकाते, शहराध्यक्ष किरणकाका गानबोटे आदि पदाधिकारी लक्ष ठेवून आहेत.
आयतांना उमेदवारी त्यातून होणारी बंडखोरी
स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असली तरी इंदापूर तालुक्यात अद्याप चित्र स्पष्ट नसल्याचे दिसून येत आहे, संभाव्य होणारे प्रवेश,पक्षनिष्ठा बाजूला ठेवून आयतांना मिळणारी उमेदवारी त्यातून होणारी बंडखोरी यातून इंदापूरचे चित्र स्पष्ट होणार आहे.
सर्वपक्षीय आघाडी
इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात सर्वपक्षीय आघाडी होण्याची कुजबूज सुरू असून त्यावर अद्याप कोणतेही स्पष्टता नसली तरी चर्चा मात्र जोरदार सुरू आहे.



