गावोगावी रक्षाबंधनाची लगबग; बहिणीकडून भावासाठी दीर्घायुष्य, आरोग्य आणि सुख-समृद्धीची प्रार्थना.
विजय शिंदे
भावंडांच्या प्रेमाचा सण रक्षाबंधन आज (शनिवार ९) इंदापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात घरोघरी साजरा होत आहे. श्रावण पौर्णिमेला साजरा होणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्य, आरोग्य आणि सुख-समृद्धीची प्रार्थना करते.
शनिवारी तालुक्यात राखीपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
बहिणींनी आपल्या भावांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
गावांमध्ये रक्षाबंधनाची लगबग दिसून आली, बहिणी माहेरला आल्या होत्या किंवा भाऊ बहिणीच्या घरी गेले होते.
राखी पौर्णिमेनिमित्त दारासमोर शेण शिंतोडा करून भावांसाठी आकर्षक व्यवस्था केली होती.
कोणी कपल राखी, म्युझिकल राखी, फॅमिली राखी सेट खरेदी केले, तर काहींनी विविध डिझायनर राख्यांची खरेदी केली. तर, पोकेमॉन, मोटू पतलू, छोटा भीम अशा लहान मुलांसाठीच्या कार्टून्स राख्यांनाही पसंती मिळाली. बहिणींनी भावासाठी आणि भावांनी बहिणीसाठी कपड्यांसह घड्याळ, सोन्याच्या दागिन्यांसह भेटवस्तूंच्या खरेदीचे निमित्त साधले.
बहिणीने भावासाठी आणि भावांनी बहिणींसाठी खास संदेश असलेले भेट कार्डही खरेदी केली. शनिवारी पारंपरिक वेशभूषा परिधान करून बहिणी भावांना ओवाळून त्यांच्या हातावर राखी बांधत आहेत.



