एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषीमंत्री पदाचा मान दिल्याबद्दल मी कृतज्ञ;शेतकरी कुटुंबात जन्मलो, वाढलो आणि शेतीच्या प्रत्येक पैलूचा अनुभव घेतला आहे. म्हणूनच शेतकऱ्यांचे दु:ख, अडचणी आणि अपेक्षा मला अंतःकरणाने समजतात.

विजय शिंदे
विधान भवनातील रम्मीचा डाव अखेर माणिकराव कोकाटे यांना चांगलाच महागात पडला आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिखाते काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या जागी राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे हे कृषिमंत्री म्हणून कारभार पाहणार आहेत तर भरणे यांच्याकडे असलेले क्रीडा आणि युवक कल्याण खाते माणिकराव कोकाटे यांना देण्यात आले आहे.
कृषिमंत्री पदी निवड जाहीर होतात मंत्री दत्तात्रय भरणे यांनी x द्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले दत्तात्रय भरणे..
एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषीमंत्री पदाचा मान दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे.
राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आणि माझे नेते मा. ना. अजितदादा पवार साहेब, तसेच उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांनी माझ्यावर राज्याच्या कृषी मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली, याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभार मानतो.
शेतकरी कुटुंबात जन्मलो, वाढलो आणि शेतीच्या प्रत्येक पैलूचा अनुभव घेतला आहे. म्हणूनच शेतकऱ्यांचे दु:ख, अडचणी आणि अपेक्षा मला अंतःकरणाने समजतात. आता मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मला त्यांच्या न्यायासाठी, हक्कासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे.
शेतकऱ्यांचा सन्मान, शाश्वत शेती आणि ग्रामीण समृद्धी हे माझे मुख्य उद्दिष्ट राहील. शासनाच्या प्रत्येक धोरणामध्ये शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन.



