बाप गाळायचा शेतात घाम, लेकीने केलं कष्टाचं चीज! ऊसाची शेती करणाऱ्या शेतकऱ्याची मुलगी झाली ‘क्लास वन’ अधिकारी.

विजय शिंदे
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत अवसरी (ता इंदापूर) येथील प्रतीक्षा आदित्य शिंदे (कवडे) यांची उपविभागीय कृषी अधिकारी पदी निवड झाली आहे.
प्रतीक्षा याचे वडील आदित्य शिंदे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत, शेतीतून ऊस हे मुख्य शेती पीक घेतले जाते. शेतीत काबाडकष्ट करत असताना शिंदे यांनी आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण केले. प्रतीक्षा हीचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत तसेच जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ सराटी येथे झाले, पदवीचे शिक्षण कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयात झाले. प्रतीक्षा शिंदे यांनी अवसरी बेडसिंगे भांडगाव बाभूळगाव येथे कृषी सहाय्यक या पदावर काम केले आहे.
प्रतीक्षा हिचे लग्न बाभूळ गावातील आकाश कवडे यांच्याबरोबर झाले लग्नानंतरही तिने अभ्यासाची चिकाटी सोडली नाही. कृषी सहाय्यक पदावर सेवा करत असताना तिने कृषी विभागातील क्लासवन अधिकाऱ्याची पोस्ट मिळवल्याने शिंदे व कवडे कुटुंबीयांसोबतच पंचक्रोशीतील नागरिकांनी प्रतीक्षा हिचे कौतुक केले आहे.
अवसरी सारख्या छोट्याशा गावांमधून मिळविलेल्या या यशाबद्दल त्याचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
यावेळी बोलताना प्रतीक्षा म्हणाली लहानपणापासून आमच्या वडिलांनी केलेले कष्ट मी पाहिलेले आहेत, कशा परिस्थितीमधून वडिलांनी आम्हाला चांगल्या पद्धतीची शिक्षण दिले व त्या परिस्थितीची जाण ठेवून प्रामाणिकपणे कष्ट केल्यास यश निश्चित प्राप्त होते, हे माझ्या यशातून मला समजले. अभ्यास करत असताना आई-वडिलांसोबतच पती व सासू-सासरे व पतींची ही साथ मिळाली.



