महाराष्ट्राच्या राजकारणातील बदलता प्रवाह;जून महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित बदल.?

विजय शिंदे
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून नाट्यमय घडामोडी घडत आहेत. २०१९ पासून कट्टर विरोधक एकमेकांचे सहकारी बनताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती आणि आघाड्या यामुळे राजकारणात काहीही अशक्य नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. “राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो,” हे वाक्य महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर अगदी चपखल बसते.
सध्या सत्तेत असलेली महायुती आघाडी आणि त्यातील अंतर्गत घडामोडी यामुळे जनतेचेही लक्ष राजकारणाकडे लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शरद पवार यांचे कौतुक आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवरील टीका यामुळे महायुतीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे वक्तव्य राजकीय विश्लेषक आणि जनतेसाठी चर्चेचा विषय ठरले आहे. शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचे कौतुक करताना फडणवीसांनी दाखवलेली प्रांजलता आणि त्याचवेळी आपल्याच सहकाऱ्यांच्या कमतरतेवर बोट ठेवण्याची धाडसी शैली यामुळे त्यांचे नेतृत्व पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकेमुळे सत्ताधारी आघाडीतील तणावही समोर आला आहे. यामुळे आगामी काळात महायुती आघाडीच्या कामकाजावर आणि एकजुटीवर काय परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात वेगळ्याच हालचाली सुरु झाल्या आहेत, येत्या जून महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित बदल घडतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात शरद पवार गट सामील होईल असे काहीसे चित्र असताना, सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष केंद्रात व राज्यात महायुतीमध्ये स्वतंत्रपणे सहभागी होऊ शकतो असे बोलले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करीत आहेत. भारत-पाक युद्धामध्ये त्यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक केले. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवार यांच्या निवडणुकीतील सातत्याचे कौतुक केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आपले अस्तित्व ठेवून खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये सहभागी होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.



