Uncategorized

इंदापुरात राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र आल्यास सगळेच सत्ताधारी.!! विरोधात कोण.?

विजय शिंदे

जनतेच्या समस्यांची फक्त विरोधी पक्षालाच काळजी असते, अशा आशयाची इंग्रजी म्हण आहे. इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस ,भाजप, शिवसेना शिंदे गट हे सत्ताधारी आहेत. तर विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी ही प्रबळ विरोधक असून काँग्रेस व उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही फक्त अस्तित्व टिकवून आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचा मोठा अवकाश सध्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षात आहे.जर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यास इंदापूर तालुक्यात विरोधक हा औषधालाही शिल्लक राहणार नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र यावेत अशी आमदार खासदारांची तसेच कार्यकर्त्यांची इच्छा आहे याबाबत खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुचवले आहे, त्यामुळे ते दोन्ही गट लवकरच एकत्र येतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

इंदापूर तालुक्यात राज्याचे क्रीडा अल्पसंख्यांक युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, इंदापूर विधानसभेची अपक्ष निवडणूक लढवलेले सोनाई परिवाराचे प्रवीण माने, पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा हे प्रमुख नेते आहेत, भरणे, गारटकर व जगदाळे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आहेत, तर माने हे महायुतीतील नेत्यांची संपर्कात आहेत, प्रवीण माने हे लवकरच भाजपमध्ये जातील अशी चर्चा सुरू आहे. यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आहे. तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत जर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तर भरणे, पाटील व जगदाळे हे एकाच व्यासपीठावर दिसून येतील.

प्रवीण माने या भाजपसोबत गेल्यास इंदापूर तालुक्यात मात्र विरोधक हा औषधालाही राहणार नाही.एका बाजूला प्रचंड बहुमत आणि दुसर्‍या बाजूला सत्तेच्या बाजूला झुकलेले विरोधक, असे चित्र इंदापूर तालुक्यात उभे राहणार आहे.

यंदाचे वर्ष निवडणुकांचे वर्ष आहे, लोकसभा आणि विधानसभेपाठोपाठ नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील, मुदत पूर्ण होऊन दोन- अडीच वर्षे उलटून गेली. तरीही स्थानिक संस्थांच्या निवडणुका पावसाळा संपल्यानंतर होतील, याची हमी खुद्द सत्ताधारी पक्षही देऊ शकत नाहीत. राज्यातील सत्तेत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्रित आहेत त्यांच्यासोबतच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एकत्रित आल्यास इंदापूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीची गणिते बदलणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष वेगळे लढवतील परंतु राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र आल्यास इंदापुरात राष्ट्रवादीची ताकत वाढणार असली तरी जुन्या नव्यांचा मेळ घालताना पक्ष नेतृत्वाला मात्र मोठी कसरत करावी लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button