Uncategorized

इंदापुरात शहा की गारटकर.? दोन दिवसात चित्र होणार स्पष्ट.!! नेत्यांच्या प्रतिष्ठेचा ‘निकाल’

विजय शिंदे

इंदापूर नगर परिषदेची निवडणूक २ डिसेंबरला पार पडली. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे मतमोजणी २१ डिसेंबरला होणार असून आता अवघे दोन दिवस उरले असताना कडाक्याच्या थंडीत शहरात राजकीय वातावरण तापले आहे.

इंदापूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यंदा अभूतपूर्व राजकीय समीकरणांमुळे वातावरण तापले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भरत शहा तर कृष्णा भीमा विकास आघाडी कडून प्रदीप गारटकर नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरल्याने इंदापूर शहर व ग्रामीण भागासह पुणे जिल्ह्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.

गारटकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी नाकारून माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना उमेदवारी दिल्याने राजकीय समीकरणे बदलली. गारटकर यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपचे नेते प्रवीण माने यांच्याशी मैत्रीचा हात पुढे केला. उपमुख्यमंत्री पवार यांनीही हर्षवर्धन पाटील यांचे एकेकाळचे साथीदार भरत शहा यांना पक्षात घेऊन राजकीय खेळी केली. या राजकीय बदलांमुळे इंदापूरमधील मतदानही सर्वाधिक झाले.

उलटे चित्र,आता सवंगडी बदलले..

मागील निवडणुकीत हर्षवर्धन पाटील आणि भरत शहा एकत्र होते. प्रदीप गारटकर आणि दत्तात्रय भरणे हे मित्र होते. आता सवंगडी बदलण्यात आल्याने उलटे चित्र निर्माण झाले. कृष्णा भीमा आघाडीच्या वतीने गारटकर यांना उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षानेही गारटकर यांना पाठिंबा दिला. एका बाजूला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रदीप गारटकर आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे आणि भरत शहा अशी लढत या नगर परिषदेत झाली.

गारटकर हे १९९२ ते १९९७ पर्यंत ते इंदापूरचे नगराध्यक्ष होते. त्यानंतर सलग दहा वर्षे नगरपालिका त्यांच्या गटाच्या ताब्यात राहिली. बदललेली राजकीय परिस्थिती पाहून त्यांनी पाटील यांच्याशी मैत्री केली. भारतीय जनता पक्षाचे युवा नेते व सोनाई परिवाराचे संचालक प्रवीण माने यांनी प्रदीप गारटकर यांना पाठिंबा दिला,हा देखील गारटकर यांच्यासाठी महत्वाचा मानला जातो.भरत शहा हे कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्ष आहेत. त्यांचा लोकसंपर्क आहे. त्यामुळे मतदारांनी कोणाला साथ दिली, हे २१ डिसेंबरला स्पष्ट होणार आहे.

प्रतिष्ठेचा ‘निकाल’ लावणार

उमेदवारी जाहीर होईपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खांद्याला खांदा लावून असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी नाकारणे आणि माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना उमेदवारी देणे, हा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पथ्यावर पडणार की, नामुष्कीची वेळ येणार, हे इंदापूरकरांच्या मतांवर अवलंबून आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक ८० टक्के मतदान हे इंदापूरमध्ये झाले असून, हे मतदान दोन्ही उमेदवारांसह कृषिमंत्री दत्तात्रय भरणे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व भाजप नेते प्रवीण माने यांच्या प्रतिष्ठेचा ‘निकाल’ लावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button