Uncategorized

अटीतटीच्या लढतीत भरणे मामांच्या उमेदवाराचा १११ मतांनी विजय, पाटील माने गारटकर यांना मोठा धक्का.

विजय शिंदे

इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत राजकीय समीकरणे पूर्णपणे उलटवून टाकणारा निकाल समोर आला आहे. अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत शहा विजयी झाले आहेत.

विशेष म्हणजे नगराध्यक्षपदाच्या लढतीत अजित पवार गटाचे भरत शहा यांनी अवघ्या १११ मतांच्या फरकाने विजय मिळवत राजकीय ताकद सिद्ध केली आहे.

नगराध्यक्षपदासाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भरत शहा यांनी प्रतिस्पर्ध्यांचा कडवा सामना करत अखेर विजय खेचून आणला. या विजयामागे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, आप्पासाहेब जगदाळे यांची साथ निर्णायक ठरली. कृषिमंत्री भरणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने इंदापुरात आपली पकड मजबूत करत एकूण १४ नगरसेवक निवडून आणले आहेत. यामुळे नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे.

दुसरीकडे, हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांच्या गटाला अपेक्षित यश मिळू शकले नाही. त्यांच्या समर्थक उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. विशेषतः प्रदीप गारटकर यांचा पराभव हा या गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. गारटकर यांना हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांचा पाठिंबा होता, मात्र तो मतपेट्यांपर्यंत पोहोचू शकला नाही. परिणामी तिघांनाही पराभवाची चव चाखावी लागली.

इंदापूर नगरपरिषदेत एकूण निकाल पाहता राष्ट्रवादी काँग्रेसने दमदार कामगिरी करत १५ उमेदवार विजयी केले आहेत. तर कृष्णा भीमा विकास आघाडीला पाच जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालामुळे नगरपरिषदेत सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती भक्कम झाली आहे. नगराध्यक्षपदावरही राष्ट्रवादी काँग्रेसचेच भरत शहा विराजमान झाल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

या निवडणुकीचा निकाल इंदापूरच्या राजकारणात दूरगामी परिणाम करणारा ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. एकीकडे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची स्थानिक पातळीवरील पकड अधिक मजबूत झाली आहे, तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button