Uncategorized

वडापुरी– माळवाडी जिल्हा परिषद गटामध्ये जगदाळे की पांढरे.? कौल मतदार राजाच्या हाती.

विजय शिंदे ..

पुणे जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू ठरणाऱ्या इंदापूर तालुक्यातील वडापुरी– माळवाडी जिल्हा परिषद गटामध्ये सध्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.

​या जिल्हा परिषद गटात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचे चिरंजीव यशराज जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रथमच निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत, तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारीसाठी डावललेले इंदापूर पंचायत समितीचे माजी सदस्य सतीश (गोटू)पांढरे यांनी आव्हान उभे केले आहे.

​सध्या वडापुरी माळवाडी जिल्हा परिषद गटात दोन ही उमेदवार “लोकाभिमुख विकासाचा” दावा करत असले, तरी खरा कौल मतदार राजाच्या हाती आहे. मतदारांनी मात्र सध्या तरी ‘मौन’ बाळगले असून, कोणाचे भविष्य उजळणार आणि कोण ‘कारभारी’ होणार, याचा फैसला आता ७ फेब्रुवारीला मतपेटीतूनच होणार आहे. ”यावेळेस निवडणूक केवळ पक्षाची नाही, तर अस्तित्वाची आणि भागाच्या विकासाची आहे.
आरोप-प्रत्यारोप होतीलच, पण प्रत्यक्ष कामाची पावती मतदार देतील.”असे मत गावागावातील पारांवर ऐकवयास मिळत आहे.

वडापुरी– माळवाडी या जिल्हा परिषद गटाची नव्याने रचना करण्यात आली आहे. यामध्ये २०१७ साली झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत वडापुरी गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सतीश (गोटू) पांढरे हे विजयी झाले होते. गेल्या पाच वर्षात तत्कालीन आमदार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून पांढरे यांनी विविध विकास कामे या गणात केली आहेत. वैयक्तिक लाभाच्या योजना व सतत मतदारसंघातील जनतेसाठी उपलब्ध ही पांढरे यांची ओळख आहे. केलेल्या विकास कामांच्या जनतेला उपलब्ध असलेल्या सेवेच्या बळावर पांढरे पुन्हा एकदा जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादीकडून इच्छुक होते.परंतु राष्ट्रवादीचे नेते आप्पासाहेब जगदाळे यांचे चिरंजीव यशराज जगदाळे यांना उमेदवारी मिळाल्याने पांढरे यांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला असून ते कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.

यशराज जगदाळे हे निवडणुकीच्या आखाड्यात पहिल्यांदा उतरले असले तरी त्यांचे वडील आप्पासाहेब जगदाळे हे इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आहेत, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते संचालक असून या माध्यमातून त्यांचाही जनसंपर्क दांडगा आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे एकत्र आल्याने यशराज जगदाळे यांना निवडणूक सोपी जाईल अशी चर्चा आहे.

तर सतीश पांढरे यांच्या विजयासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी पूर्ण ताकद लावली आहे.

वडापुरी माळवाडी हा जिल्हा परिषद गट आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या समृद्ध असल्याने, मतदान करताना मतदार राजा या गटात विकास कामांना अधिक प्राधान्य देईल अशी शक्यता आहे. जातीपातीच्या राजकारणापेक्षाही सहज उपलब्ध राहणाऱ्या उमेदवाराला अधिक प्राधान्य मिळणार आहे.जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण असल्याने इंदापूर तालुक्यातील सर्व नेत्यांचे लक्ष या गटावर लागले आहे.

गणात ही लक्षवेधी लढती..

वडापुरी गणात राष्ट्रवादी काँग्रेस कडून अर्चना खबाले तर भारतीय जनता पक्षाकडून शारदा देशमुख निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत, तर माळवाडी गणात राष्ट्रवादी काँग्रेस कडून कल्पना पाटील तर भारतीय जनता पक्षाकडून वैशाली मारकड निवडणुकीच्या मैदानात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button