प्रवीण माने यांचा भाजपमध्ये प्रवेश; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांच्यापुढे असणार आव्हान.

विजय शिंदे.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती, सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने यांनी आज (बुधवार २ जुलै) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. मुंबईत भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे माने यांनी सांगितले.गेल्या काही दिवसांपासून माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रवेशाचे संकेत दिले होते त्यामुळे त्यांच्या प्रवेशाची पार्श्वभूमी आधीच तयार होती.
प्रवीण माने हे पूर्वी एकत्रित राष्ट्रवादीचे सक्रिय नेते होते. मात्र पक्षात फूट पडल्यानंतर ते दोन्ही गटांपासून हळूहळू दूर झाले. लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचारही सुरू केला होता परंतु मतदानाला काही दिवस बाकी असताना त्यांनी अचानक आपला निर्णय बदलत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार सुरू केला.
लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला परंतु २०२४ मध्ये शरद पवारांच्या गटाने त्यांना उमेदवारी नाकारत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना तिकीट दिलं. त्यानंतर माने यांनी अपक्ष उमेदवार म्हणून इंदापूर विधानसभा लढवली आणि तब्बल ३७ हजार मते मिळवून प्रभाव दाखवून दिला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांच्यापुढे आव्हान
प्रवीण माने यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला परंतु त्यांच्यापुढे आता आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद निवडणूक लढवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपने स्वबळावर लढवल्यास क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर तगडे उमेदवार देऊन भाजपच्या पक्षश्रेष्ठींना आपली ताकद दाखवून द्यावी लागणार आहे. माने यांचा खरा कसं त्यांच्या हक्काच्या पळसदेव– बिजवडी जिल्हा परिषद गटात लागणार आहे.



