इंदापूरचा विकास नवा तर “शहा” कुटुंबातील चेहरा हवा..
इंदापुरात ‘शहा’ कुटुंबाच्या राजकीय भूमिकेकडे लक्ष.

विजय शिंदे
इंदापूर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत जाहीर झाले असून नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण निघाल्याने
इंदापूर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता शहा व त्यांचे पती मुकुंद शहा व इंदापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा या शहा कुटुंबायांच्या आगामी राजकीय भूमिकेकडे इंदापूर तालुक्याचे लक्ष वेधले आहे.
इंदापूर नगर परिषदेची निवडणूक शहा कुटुंबियांनी लढवावी असा आग्रह असणारा मोठा वर्ग इंदापूर शहरात आहे,इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माजी नगराध्यक्षा अंकिता शहा , मुकुंद शहा व भरत शहा हे बंधु कोणती राजकीय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. इंदापूर शहर व ग्रामीण भागामध्ये शहा कुटुंबांना माणणारा एक वेगळा वर्ग असून मुकुंद शहा यांचे वडील दिवंगत गोकुळदास शहा हे कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक व्हाईस चेअरमन होते . दिवंगत माजी खासदार शंकरराव पाटील यांचे विश्वासू सहकारी होते.
इंदापूर नगरीच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी शहराचे नाव देशपातळीवर पोहोचवले आहे.सर्वसामान्यांशी कणव, शहरविकासाचा ध्यास,पर्यावरणचळवळीतील योगदान, पायाभूत विकासासाठी भरीव निधी, नागरिक आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधणाऱ्या अंकिता शहा यांनी मागील पाच वर्षात नगराध्यक्ष म्हणून उत्कृष्ट काम केले असल्याची चर्चा इंदापूर शहरात आहे.
कोविड काळात प्रत्येक घटकांपर्यंत मदत पोहचविणाऱ्या नगराध्यक्ष म्हणून अंकिता शहा यांच्याकडे पाहिले जाते. इंदापूर शहर व परिसरात वृक्ष लागवडीचे मोठे काम शहाकुटुंबियांनी हाती घेतले असून शहर व परिसरातील शाळेतील मुलांना मोठ्या प्रमाणात गणवेश मोफत दिले जात असल्याने त्यांच्याबद्दल प्रेम असणारा मोठा वर्ग या परिसरात आहे.
अंकिता शहा व शहा परिवाराने शहरामध्ये स्वच्छता चळवळ निर्माण करून नागरिकांमध्ये जनजागृती करून शहर स्वच्छतेचा ठसा देशभरात उमटविला आहे. शहा यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता सर्वेक्षणामध्ये सलग तीनवेळा राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट कामगिरी करून इंदापूरकरांची मने जिंकली आहेत. सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून त्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी काम केले.
इंदापूर शहर व तालुक्यात शहा कुटुंबाला माणणारा मोठा वर्ग असल्याने शहा कुटुंब आता कोणती राजकीय भूमिका घेणार याकडे इंदापूर शहरासह इंदापूर तालुक्याचे लक्ष वेधले आहे.



