इंदापूर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक जागेचा कायमस्वरूपी प्रश्न मिटवण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू.
विजय शिंदे
इंदापूर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक जागेचा कायमस्वरूपी प्रश्न मिटवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याशी पाठपुरावा करणार असल्याचे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत म्हणाले.
इंदापूर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकास आमदार खोत यांनी भेट दिली (बुधवार ३०) यावेळी ते बोलत होते.
इंदापूर येथील कला विज्ञान वाणिज्य कॉलेज समोरील धर्मवीर चौकात इंदापूर शहरातील युवकांनी गनिमी कावा करत शासनाच्या जागेवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारले आहे, गेली साठ दिवस या स्मारकास युवकांनी पहारा देत प्रशासनाच्या वतीने स्मारक हटवले जाऊ नये यासाठी दक्षता घेतली आहे. धर्मवीर संभाजी महाराज यांचे स्मारक शासनाने अधिकृत करून मान्यता द्यावी अशी मागणी इंदापूर शहरातील युवकांच्या वतीने होत आहे.
यावेळी आमदार सदाभाऊ खोत म्हणाले की या निवेदनात ज्या मागण्या केल्या आहेत त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित मंत्रालयाशी बोलणार आहे, इंदापूर शहरातील तसेच पंचक्रोशीतील शिवप्रेमींच्या भावना जाणून घेऊन कायमस्वरूपी तोडगा निघेल याकडे लक्ष देऊ.
यावेळी प्रशांतमामा उंबरे म्हणाले इंदापूर तालुक्यातील शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेऊन शासनाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकास जागा उपलब्ध करून द्यावी,छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षण आणि विस्तारासाठी संभाजी महाराज यांनी जीवन समर्पित केले. त्यांनी दाखवलेले असीम शौर्य आणि धैर्य यामुळे सर्व युद्धांमध्ये त्यांना विजयश्री मिळाली. औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येतील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन येथेच पराक्रमाची शर्थ केली. स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरुपी जपण्यासाठी इंदापूर येथे स्मारक उभारण्यात आले आहे.
यापूर्वी केंद्रीय सहकार व नागरी हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे क्रीडा व अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही स्मारकास भेट दिली आहे.यावेळी इंदापूर शहर व परिसरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



