जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त इंदापूर प्रशासन सज्ज.
विजय शिंदे
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूर तालुक्यात शुक्रवारी (ता. २७) प्रवेश करीत असून सोमवार (ता. ३०) पर्यंत विविध गावांमध्ये विसावणार आहे.या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली.पालखी सोहळ्यातील सर्व भाविकांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करण्याची आवश्यकता पडू नये, त्यासाठी पोलिस विभागाने रहदारी नियमन पथक, पालखी मधील तुकोबारायांचे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या रांगा, रस्त्यामध्ये असणारे हॉकर्स, कोणत्याही प्रकारची चोरी होऊ नये, म्हणून पोलिस अधिक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाने नियोजन करण्यात आले आहे.
यामध्ये भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून पालखी सोहळ्यासोबत आणि त्यापुढे काही अंतरावर पोलिस पथक, फिक्स पॉइंट पेट्रोलिंग नेमण्यात आली आहे. जेणेकरून पालखी सोहळ्यास कोणत्याही प्रकारचा प्रादुर्भाव अगर त्रास होऊ नये, यासाठी इतर विभागांशी समन्वय ठेवून व्यवस्था केल्याची माहिती कोकणे यांनी दिली.
इंदापूर तालुक्यातील पालखीचा कार्यक्रम
शुक्रवार (ता. २७) – दुपारी बारामतीवरून भवानीनगर कारखाना, संध्याकाळी मुक्काम सणसर.शनिवार (ता. २८) – पहिली विश्रांती व बेलवाडी (गोल रिंगण), दुपारचे भोजन, त्यानंतर लासुर्णे, जंक्शन, अंथुर्णे, शेळगाव, गोतोंडी त्यानंतर निमगाव केतकी मध्ये मुक्काम.रविवार (ता. २९) – तरंगवाडी ओढा, इंदापूर शहर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या लगतच्या पालखी तळावर गोल रिंगण झाल्यानंतर मुक्काम.सोमवार (ता. ३०) – गोकुळीचा ओढा (विठ्ठलवाडी), वडापुरी, सुरवड, बावडा, सराटीत मुक्काम



