जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची चाहूल; गट— गण रचना करण्याची प्रक्रिया सुरु.

विजय शिंदे
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आता प्रशासन पातळीवर तयारी सुरु झाली आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समित्या व नगर पालिकांच्या निवडणुकांच्या दृष्टीने जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण रचना करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
त्यानुसार गट-गण रचनेची जबाबदारी संबंधित तहसिलदारांवर असेल. तर, या प्रक्रियेचे पर्यवेक्षण संबंधित उपविभागीय अधिकारी करतील. साधारण सव्वा तीन वर्षांपासून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासक राज आहे. मागच्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्यासंदर्भात सकारात्मक निर्देश दिल्यानंतर शासन पातळीवर हालचाली सुरु झाल्या.आता जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या दृष्टीने गट व गणरचनेचा महत्वाचा टप्पाही प्रशासनाने हाती घेतला आहे. जिल्हा परिषद गट – पंचायत समिती गण रचनेची प्रक्रिया ता. १८ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यासाठी ता. १४ जुलैपर्यंत प्रारुप जाहीर होणार आहे.
गट आणि गण रचनेचे प्रारूप प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावरील आक्षेप, हरकती आणि सूचना तहसीलदारच स्विकारतील. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव जाणार असून त्यावरील सुनावणी आयुक्त घेणार आहेत. त्यामुळे आता या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.
एक गट, दाेन गण वाढणार
दरम्यान, २०१७ साली झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इंदापूर तालुक्यात ७ जिल्हा परिषद गट व १४ पंचायत समिती गण होते. आता यात एक गट आणि दोन गणांची भर पडणार आहे.
असा आहे गट – गण रचनेचा कार्यक्रम
प्रारुप प्रभागरचना: १४ जुलै पर्यंतहरकती व सुचना : २१ जुलैहरकतींवर आयुक्तांकडे प्रस्ताव : २८ जुलैहरकतींवर सुनावणी : ११ ऑगस्टअंतिम गट – गणरचना आयोगाकडे पाठविणे : १८ ऑगस्टऑक्टोबर ः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका प्रस्तावित



