जि.प. पसं निवडणुका जुन्या प्रभागरचनेनुसार होणार असल्याचे स्पष्ट.

विजय शिंदे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर गेल्या दोन वर्षापासून विविध कारणांमुळे रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक रणसंग्राम लवकरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जुन्या की नव्या प्रभाग रचनेनुसार होणार? याबाबत संभ्रमावस्था असताना या निवडणुका जुन्या प्रभागरचनेनुसार होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने इंदापूर तालुक्यातील सात जिल्हा परिषद गट आणि चौदा पंचायत समिती गणांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहेत.
दोन वर्षापासून रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता होणार असल्याने या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांनी आतापासून आपल्या उमेदवारीची मोट बांधण्याला सुरवात केली आहे. ग्रामीण भागातील राजकीच वर्चस्व अधोरेखित करणाऱ्या येथील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील लोकप्रतिनिधींची मुदत मार्च २०२२ ला संपली होती. त्यानंतर, विविध कारणांनी या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या होत्या. त्यामुळे मुदत संपल्यापासून गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा कारभार प्रशासकामार्फत चालवला जात आहे.
तालुक्यातील अनेक नेत्यांची पूर्वीच्या गट गण रचनेत विभागणी होऊन नव्याने झालेल्या फेररचनेमध्ये वोट बँक विभागली गेली होती. काही गावे दुसऱ्या प्रभागात समाविष्ट झाल्याने तेथील ग्रामस्थ, मतदार नाराज होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आणि जुन्या प्रभाग रचनेनुसार जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांसह इच्छुकांमध्ये आनंदी अन् उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्याकडून आतापासून मोर्चेबांधणीला सुरवात करण्यात आली आहे.
निवडणुका होणार चुरशीची.
राज्याचे क्रीडा व अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भोवती इंदापूर तालुक्याचे राजकारण कायम फिरत असते. दोन्ही नेते तुल्यबळ असल्याने अगदी छोट्या निवडणुकाही ताकदीने लढवल्या जातात, त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही चुरशीने होणार, हे निश्चित आहे.
इंदापूर विधानसभेची अपक्ष निवडणूक लढवलेले प्रवीण माने हे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. माने यांचा भाजप प्रवेश झाल्यास इंदापुरात तिरंगी लढत पाहावयास मिळण्याची शक्यता आहे.
इंदापूर तालुक्यातील पूर्वीचे जिल्हा परिषद पंचायत समिती गट गण.
१) भिगवन —शेटफळगडे.
२) पळसदेव —बिजवडी.
३) काटी —वडापुरी
४) निमगाव_ शेळगाव.
५) कळस—वालचंदनगर
६) लासुरणे -सनसर
७) बावडा— लाखेवाडी



