स्पष्टवक्ता, मनमोकळा स्वभाव, अथक मेहनत करणारा नेता.

उपमुख्यमंत्री अजित पवार वाढदिवस विशेष..
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस. मोकळं-ढाकळं व्यक्तिमत्व, रांगडा गडी, न पटणारं वय, असं सरळ वर्णन अजित पवार यांचं करावं लागेल. अजित पवार हे ६५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. अजित दादांकडे बघून ते ६५ वर्षांचे आहेत असं कोणाला पटणारही नाही. स्पष्टवक्ता, मनमोकळा स्वभाव, अथक मेहनत करणारा नेता आणि प्रशासनावर हुकूमत असलेला नेता म्हणून अजितदादा यांची ख्याती आहे.

काम होत असेल तर तिथल्या तिथे सोक्ष-मोक्ष, पण काम होणार नसेल तर नाही म्हणून स्पष्टपणे सांगणे अशी अजित पवारांची ख्याती आहे. गावरान भाषेला याठिकाणी…त्याठिकाणी अशा शब्दांची जोड देऊन केलेली भाषणं कुणाची असं जर कुणी विचारलं, तर डोळे झाकून लोक अजित दादांचं नाव घेतील. कशाची तमा न बाळगता जे आहे ते बोलणारा नेता म्हणून अजित दादांना ओळखलं जातं.
राजकारणात एन्ट्री
त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचे किस्से नोंदले जातात तर कधी माध्यमांच्या हेडलाईन्स बनतात. संभ्रम होण्याऐवजी स्पष्ट बोलणं हा त्यांचा स्वभावगुण. नगर जिल्ह्यातील प्रवरात २२ जुलै १९५९ रोजी अजित पवारांचा जन्म झाला. देवळालीत शिक्षण झालं. त्यानंतर १९८२ मध्ये अजित पवारांची पॉलिटिकल इनिंग सुरु झाली. छत्रपती सहकारी साखर कारखाना, सहकारी संस्थांच्या निवडणुकीत अजित दादा झळकू लागले. मात्र सक्रीय राजकारणात अजित दादांची एण्ट्री झाली ती १९९१ मध्ये. अजित पवार बारामतीतून खासदार बनून दिल्लीत गेले.
दिल्ली तेव्हा राजकीय दृष्ट्या अस्थिर होती. त्यामुळे शरद पवारांसाठी अजित पवारांनी खासदारकीचा राजीनामा दिला. शरद पवार पुढे नरसिंहराव सरकारमध्ये संरक्षण मंत्री बनले. त्यानंतर अजित पवार महाराष्ट्रात ॲक्टिव्ह झाले. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदापासून सुरू झालेला अजित दादांचा प्रवास उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचला.
अशा महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा..
शुभेच्छुक.
पृथ्वीराज श्रीनिवास घोलप
संचालक छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर.



