आषाढी यात्रेवर पुराचे सावट; उजनीतून भीमा नदीत होणार पाण्याचा विसर्ग..

विजय शिंदे
उजनी धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच जून महिन्यात उजनी धरणाने शंभरीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. पूर परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाला तातडीने पूर नियंत्रणाच्या दृष्टीने हालचाल करण्याची वेळ आली आहे.उजनी धरणात वेगाने पाणी जमा होऊ लागले आहे. जवळपास 60 हजार क्युसिक विसर्गने पाणी धरणाकडे येत असल्याने धरणाची पाणी पातळी वेगाने वाढू लागली आहे.
आषाढी सोहळ्यात संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे. अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
पाण्याचा विसर्ग 70 हजारापेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी धरण 75 टक्के वर गेल्यानंतर पाणी सोडण्यास सुरुवात केली जाणार असून 75 टक्के एवढी धरणाची पातळी आषाढी यात्रा संपेपर्यंत कायम ठेवण्याची प्रशासनाने तयारी केली आहे. यामुळे आता येईल ते सर्व पाणी पंढरपुरात महापूर येणार नाही याची दक्षता घेत भीमा नदीमध्ये सोडून संभाव्य पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या सूचना पालकमंत्री गोरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.



