Uncategorized

जुन्यांना पुन्हा लंगोट; की नव्या उमेदवारांना संधी.

विजय शिंदे

संपूर्ण पुणे जिल्ह्यासह पुण्याच्या इंदापूर तालुक्यात ही आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. नुकतीच इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची रचना जाहीर झाली असून त्यानंतर आता खऱ्या अर्थाने निवडणुकीसाठी इच्छुक असणारे तयारीला लागल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

या निवडणुकीत अनेक युवा चेहऱ्यांकडे मतदारांचे लक्ष लागलेले असताना नव्याने रचना करण्यात आलेल्या काटी लाखेवाडी गटात यंदा चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.

गट गणाच्या आरक्षण सोडतीनंतर चित्र स्पष्ट होणार असले तरी उमेदवारासंदर्भात अनेक आराखडे बांधले जात आहेत. या पक्षाकडून हा उमेदवार दिला तर विरोधकांकडून हा उमेदवार दिला जाईल अशी अनेक अटकळे बांधली जात आहेत, क्रीडा व अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासोबतच, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे,माजी सभापती व भाजप नेते प्रवीण माने यांना मानणारा वर्ग या मतदारसंघात असल्याने उमेदवार ठरवताना यांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे.

काटी– लाखेवाडी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील समर्थक यांच्यात तुल्यबळ लढत होणार असून भारतीय जनता पार्टी चे उमेदवार मैदानात उतरणार असल्याने निवडणूक तिरंगी होणार की या आधीच काही राजकीय घडामोडी घडणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे. या गटात इच्छुकांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येते, हर्षवर्धन पाटील गटाकडून इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव वाघमोडे, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक कृष्णाजी यादव, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला अध्यक्षा छाया पडसळकर,तानाजी नाईक, फ्रफुल चव्हाण, राजकुमार जाधव, अमर काळकुटे,शशिकांत शेंडे, शिवाजी यादव, अतुल वाघमोडे,संजय शिंदे, बबलू पठाण या नावांची चर्चा आहे.

तर राष्ट्रवादी पक्षाकडून राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष व विद्युत वितरण समितीचे माजी अध्यक्ष अतुल झगडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले,
वरकुटे खुर्द चे सरपंच बापू शेंडे, बाळासाहेब करगळ,काटी गावचे युवा नेते हेमंत पाटील, सोमनाथ वाघमोडे या नावांची चर्चा आहे.

तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख नितीन शिंदे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. तर भारतीय जनता पार्टी कडून अनेक इच्छुक उमेदवार निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. हा गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यास महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नीलकंठ मोहिते ही निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. तेज पृथ्वी ग्रुपच्या अध्यक्ष अनिताताई खरात या गटातून लढण्यासाठी इच्छुक आहेत.

जातीय समीकरणे अशी आहेत.?

काटी–लाखेवाडी या जिल्हा परिषद गटात मराठा समाजाचे सर्वाधिक मतदान आहे, त्या खालोखाल माळी समाज व धनगर समाजाचे मतदान आहे.

हा मतदारसंघ सर्वसाधारण झाल्यास पंचायत समिती गणातील आरक्षण महत्त्वाचे ठरणार असून जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूकडून होणार आहे.

हा जिल्हा परिषद मतदार संघ ओबीसी साठी राखीव झाल्यास मात्र या गटात तुल्यबळ लढत होणार असल्याचे दिसून येत आहे, आर्थिक सामाजिक समीकरणे साधताना नेत्यांची मात्र चांगलीच कसरत होणार आहे.

सौभाग्यवतींना संधी..?

गेली दोन-तीन वर्ष निवडणूक लांबल्याने इच्छुकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली, यावेळेस मात्र वयाचा व मिळालेल्या संधीचा उपयोग करायचा, कोणत्याही अटीवर थांबायचं नाही अशी अटकळ इच्छुकांनी बांधली आहे, मतदारसंघ महिला राखीव झाल्यास पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेसाठी सौभाग्यवतींना मैदानात उतरायचे पण थांबायचे नाही या मतावर इच्छुक मात्र ठाम आहेत.

जुन्यांना पुन्हा लंगोट..

या गटात हर्षवर्धन पाटील गटाकडून विलासराव वाघमोडे व कृष्णाजी यादव हे ओबीसी समाजाचे मोठे नेते येतात, तर राष्ट्रवादीकडे अतुल झगडे श्रीमंत ढोले व बापू शेंडे हे ओबीसी नेते येतात.

यामध्ये विलासराव वाघमोडे यांनी पंचायत समितीचे सदस्य सभापतीपदी काम केले आहे, तर कृष्णाजी यादव यांनी सहकार व संघटनेमध्ये सर्वाधिक काळ घालवला आहे परंतु वेळ पडल्यास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गटाकडून हे दोन्ही नेते पुन्हा मैदानात उतरू शकतात.

तर राष्ट्रवादीकडून माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, बापू शेंडे तर नव्या दमाचा अतुल झगडे यापैकी एक जिल्हा परिषदेच्या मैदानात उतरू शकतात. परंतु जातीय समीकरणे साधत कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे उमेदवार ठरवावे लागणार आहेत.

लाखेवाडी काटी गट : काटी, रेडा, वरखुटे खुर्द, सराफवाडी, पिटकेश्वर, घोरपडवाडी, दगडवाडी, निरवांगी.

लाखेवाडी गण : लाखेवाडी, पंधरवाडी, रेडणी, शेट हवेली, भोंडणी, झगडेवाडी, जाधववाडी, खोरोची.

टीप: कोणत्याही पक्ष संघटनेच्या इच्छुकाचे नाव राहिले असल्यास कळवावे दुरुस्ती करण्यात येईल.. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button