आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान.
विजय शिंदे
‘जाता पंढरीशी सुख लागे जीवा… अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर…’ अशा संतोक्तीची प्रचिती देत असलेला तीर्थक्षेत्र पंढरपूरचा आषाढी सोहळा आज रविवार मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.यंदा आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.
यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून कैलास दामू उगले (वय ५२ वर्षे) आणि त्यांची पत्नी कल्पना कैलास उगले (वय ४८ वर्षे) मु. पो. जातेगांव, ता. नांदगाव जि. नाशिक यांना महापूजेचा मान मिळाला. दाम्पत्य गेल्या १० ते १२ वर्षापासून नियमितपणे वारी करत आहेत. कैलास यांचे वडील माजी सैनिक आहेत.शासकीय महापूजेवेळी राज्याचे मंत्री गिरीश महाजन, जयकुमार गोरे यांच्यासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, राजेंद्र शेळके, मनोज शोत्री यांच्यासह अन्य अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.



