स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर यंदांच्या दहीहंडी उत्सवाला राजकीय झळाळी.

विजय शिंदे
गेल्या २ वर्षांपासून खोळंबलेल्या नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूकांचे बिगुल येत्या एक दोन महिन्यात वाजणार आहे. या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर यंदांच्या दहीहंडी उत्सवाला राजकीय झळाळी मिळणार असून या झळाळीत गोविंदा पथकांची चांदी होणार आहे.
निवडणुकांमुळे दहीहंडीचे राजकीय आयोजकही वाढणार असून गोविंदा पथकांसाठी राजकीय प्रायोजक वाढणार असल्याने गोविंदाची चांदी होणार आहे.
इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरतशेठ शहा यांनी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू केलेल्या उत्सवाला गेल्या काही वर्षांत इव्हेंटचे रूप प्राप्त झाले आहे, राज्यातील नामवंत कलाकार या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे महिलांसाठी दर्जेदार कार्यक्रम येथे आयोजित केले जात आहेत.
तर दुसरीकडे शहा यांचे राजकीय प्रतिस्पर्धी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी तरूणाईला साद घालणारा हा उत्सव भरवत गौतमी पाटील नंतर यावर्षी सोनाली कुलकर्णी यांना निमंत्रित केले आहे.या आयोजनात इंदापूर शहरासोबतच तालुक्यातील राजकीय नेते आघाडीवर असल्याने इंदापूर शहर व ग्रामीण भागातील गोविंदा पथके हंडी फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात, त्यामुळे आयोजकांनाही त्याची दखल घ्यावी लागते.
आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दहीहंडी उत्सवाला अधिक महत्त्व आले असून गोविंदांसोबतच समर्थकही अधिक उत्साही होत आहेत,या उत्सवात गोविंदावर बक्षीसांची लयलूट राजकीय नेते करत आहेत.
शहरात शहा व गारटकर मित्रपरिवारासोबतच इतरही मंडळांकडून दहीहंडीचे आयोजन केले जात आहे तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील गटातील नेत्यांचे लक्ष या दोन्ही दहीहंडीवर असून होणाऱ्या राजकीय घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात बोरी —वालचंदनगर गटातून जिल्हा परिषदसाठी इच्छुक असलेले आनंदनगर चे सरपंच रोहित मोहोळकर यांनीही दहीहंडीचे आयोजन केले असून गौतमी पाटील यांना निमंत्रित केले आहे.
आयोजित केलेली हंडी मंडळातील गोविंदा फोडतील परंतु आगामी काळात होणाऱ्या नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदेची हंडी फोडण्यासाठी मात्र नेते तयारीला लागल्याचे दिसून येत आहे.



