पुणे-सोलापूर मार्गावर भरधाव टँकरची दुचाकीला धडक; 94 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू, वाहनासह चालक फरार
विजय शिंदे
पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर तालुक्यातील वनगळी गावच्या हद्दीत भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात टँकरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने ९४ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून टँकरचालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला आहे. या प्रकरणी इंदापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार (ता. 31 मार्च) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास वनगळी (ता. इंदापूर) हद्दीत बिजवडी कारखाना पुलाजवळ, टोरेंट कंपनीच्या सीएनजी पंपासमोर संदीप किशोर देवकर (वय-43) आणि त्यांचे चुलते प्रतापराव विठ्ठल देवकर (वय-94, दोघेही रा. वरकुटे बु., ता. इंदापूर) हे दुचाकी (एमएच 42 एझेड 2543) वरून इंदापूरकडे येत असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात टँकरने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत जोरदार धडक दिली.
या अपघातात प्रतापराव देवकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर संदीप देवकर हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर चालकाने कोणतीही मदत न करता टँकरसह घटनास्थळावरून पळ काढला. या अपघात प्रकरणी प्रविण यादवराव देवकर (रा. वरकुटे बु.) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार यादव करत आहेत.
दरम्यान मयत प्रतापराव विठ्ठल देवकर हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 4 मुले, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक किशोर देवकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक विजयकुमार देवकर, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र देवकर व इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते संदेश देवकर यांचे वडील होत. तसेच वरकुटेच्या पोलिस पाटील पल्लवी संदेश देवकर या त्यांच्या स्नुषा होत. प्रतापराव देवकर यांच्या अपघाती निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.



